नागपूर : येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हे सर्वात मोठे अभियान ठरणार आहे. मात्र ज्यांनी लसीकरण केले, त्यांना दोन डोसच्या काळात किमान दोन-अडीच महिने रक्तदान करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्याची रक्तदानाची गरज लक्षात घेता, लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक तरुण यासाठी सरसावले आहेत. आम्ही रक्तदान केले, आपणही करा, असे आवाहन त्यांनी इतरांना केले आहे.
गेल्या वर्षी कोरोना महामारीचा प्रकोप सुरू झाल्यापासून रक्तदानाचे प्रमाण नगण्य झाले आहे. सामाजिक संस्थांची नियमित शिबिरे बंद झाली आहेत. महाविद्यालये बंद असल्याने तरुण रक्तदात्यांचे प्रमाणही घटले आहे. या परिस्थितीमुळे मेयो, मेडिकलच्या शासकीय रुग्णालयांसह खासगी रक्तपेढ्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असून, रक्तासाठी गरजू रुग्णांना संघर्ष करावा लागतो आहे. त्यामुळे रक्तदानाची नितांत गरज निर्माण झाली आहे. शासकीय रुग्णालयाकडून यामुळेच रक्तदानासाठी आवाहन केले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाविरुद्धची पहिली लस घेतल्यानंतर किमान महिनाभर व दुसऱ्या डोसनंतर पुढचा महिना-दीड महिना रक्तदान करणे योग्य नाही. लोकमतनेही त्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन तरुणांना केले आहे. अनेक तरुणांनी रक्तदान करून या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. अनेक तरुण रक्तदानासाठी पुढे येत आहेत. सेवा फाऊंडेशनच्यावतीने येत्या ३० एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीनेही रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे.