नागपूर : कोरोनाचे संक्रमण वाढत असताना औषधांचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतो आहे. त्यातच महागड्या औषधी गरीब गरजूंना घेणे अवघड आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अशा गरजूंना आवश्यक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील काही तरुणांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून औषधांचे करा दान असे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यातच या उपक्रमाला सुरुवात झाली अन् २० ते २५ गरजूंना औषधी त्यांनी पुरविल्या आहे.
कोरोनाचा विळखा चांगलाच वाढल्याने घरोघरी रुग्ण आहेत आणि औषधीही आहेत. यातून जे रुग्ण बरे झाले आहेत, त्यांच्या शिल्लक औषधी घरीच पडून आहे. या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याच औषधी दान करण्याचे आवाहन केले आहे. ही संकल्पना या ग्रुपमधील कुणाल पुरी यांना सुचली. त्यांच्या घरातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. ते बरे झाल्यानंतर शिल्लक औषधी घरातच पडून होत्या. महागड्या औषधी कुणाच्या तरी कामी याव्यात, या भावनेतून त्यांनी मित्रांपुढे ही संकल्पना व्यक्त केली आणि सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले. अनेकांनी त्यांच्या उपक्रमाला प्रतिसाद दिला. त्यांनी शहरातील मित्रमंडळींना ज्यांना औषधांची गरज आहे. अशा लोकांसोबत संपर्क करायला लावला. हे तरुण औषधी गोळा करतात आणि डॉक्टरांच्या प्रीस्क्रीप्शननुसार गरजूंना औषधी उपलब्ध करून देतात.
सोबतच या तरुणांनी ते राहत असलेल्या परिसरात औषधांची फवारणी स्वत:च्या खर्चाने सुरू केली आहे. दररोज सायंकाळी ही मंडळी फवारणीचे यंत्र घेऊन घरोघरी फवारणी करीत असतात. या उपक्रमात अश्विन धनविजय, गणेश कुटे, सुमित भालेकर, अजय डोंगरे, संदीप देशपांडे, रिषभ माहुले, मुकेश गजभिये यांचा सहभाग आहे.
- आज घरोघरी कोरोनाचे रुग्ण आहेत. सर्वांनाच चांगले उपचार व औषधी मिळू शकत नाही. औषधी महाग असल्याने गरिबांनाही त्या परवडत नाही. आमच्या छोट्या उपक्रमातून गरीब रुग्णांचा औषधांचा खर्च वाचत असेल तर तेवढाच त्यांना आधार होईल.
कुणाल पुरी