नागपूर : उद्याचे आदर्श नागरिक घडवित असताना एका शिक्षकाने मरणानंतरही अवयवदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. ते स्वत: किडनीच्या प्रतीक्षेत असताना शेवटच्या श्वासाला स्वत:चे लिव्हर दान करून दुसऱ्याला जीवनदान दिले. या वर्षातील हे पहिले तर आतापर्यंतचे ९६वे अवयवदान झाले.
यवतमाळ वणी चाळीसगाव साधनकर वाडी येथील दिलीप पांडुरंग गोहोकर (४९) त्या अवयवदात्याचे नाव. ते उच्च शिक्षित होते. शिक्षण प्रसारक मंडळ हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे गोहोकर हे किडनी विकाराने त्रस्त होते. ते डायलिसीसवर होते. त्यांनी किडनीसाठी ‘झेडटीसीसी’कडे नोंदणी केली होती. १२ जानेवारी रोजी ते शाळेत शिकवित असताना अचानक त्यांना चक्कर व उलट्या होऊ लागल्या. नागपुरातील एस. एस. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ११ दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. उपचार सुरू असताना डॉक्टरांच्या टीमने त्यांना ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषित केले. त्यांच्या पत्नी शिल्पा आणि भाऊ राजीव यांचे डॉ. अमित पसरी यांनी अवयवदानासाठी समुपदेशन केले. अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दाढेत जगणे काय असते हे त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे तत्काळ होकार दिला. ही माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन कॉर्डिनेटर वीना वाठोरे यांनी पुढील अवयवदानाची प्रक्रिया पार पाडली.
-५६ वर्षीय महिलेला मिळाले नवे जीवन
गोहोकर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने त्यांचे यकृत (लिव्हर), फुप्फुस व दोन्ही बुबुळाचे दान करण्यात आले. परंतु फुप्फुस प्रत्यारोपणासाठी वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य असल्याचे आढळले. यामुळे बुबुळ महात्मे आय बँकेला तर, यकृत ॲलेक्सीस हॉस्पिटलमधील ५६ वर्षीय महिलेला दान करण्यात आले. अवयव प्रत्यारोपणात डॉ. मनीष बलवानी, डॉ. स्वीटी पसरी, डॉ. चारुलता बावनकुळे, ओटी कर्मचारी नरेंद्र नागपुरे, उमा पुरे, स्नेहल बोरकर आणि अलिशा गायकवाड आदींनी सहकार्य केले.