नागपूर : दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने ऑक्सिजन प्लांटसाठी १२० कोटी रुपयाचे दान दिल्याची माहिती सांगणारा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट आहे. हा व्हिडीओ नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात गुरुवारी नोंदविण्यात आली.
नुकताच हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यात दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने ऑक्सिजन प्लां साठी १२० कोटी रुपये दान करण्यात आल्याची चुकीची माहिती सांगितली गेली होती. हा व्हिडिओ बनावट असल्याचे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, 'भीमराव की बेटी' या सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष ऍड. सोनिया गजभिये यांनी आज अजनी पोलीस ठाण्यात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरुद्ध तक्रार नोंदवली.
या तक्रारीत तसेच पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी अशा प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्या आणि दीक्षाभूमी सारख्या पवित्र स्थळाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना शोधून काढा तसेच त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी अॅड. गजभिये यांनी केली.