नागपूर : दिवाळीपूर्वी कमी झालेली कोरोनाबाधितांची संख्या डिसेंबरमध्ये वाढताना दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात बाधितांची संख्या स्थिर असली तरी जीव वाचविण्यासाठी शासकीय रक्तपेढीतून प्लाझ्मा उपलब्ध करून देणे अडचणीचे जात होते. अखेर यात लाईफलाईन रक्तपेढीने पुढाकार घेतला. सामाजिक कर्तव्यातून १०१ आरबीडी प्लाझ्मा बॅगचे दान केले. विशेष म्हणजे, स्वत: भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या शिबिराचे नियोजन केले होते.
कोरोनाबाधितांवरील उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरली आहे. परंतु भंडाऱ्यात दाते प्लाझ्मा देण्यास तयार असताना सोयींचा अभाव होता. मेडिकलकडूनही प्लाझ्मा मिळण्यास एक ते दोन दिवस वेळ लागायचा. यामुळे रुग्ण अडचणीत यायचे. याची दखल जिल्हाधिकारी कदम यांनी घेतली. त्यांनी भंडाऱ्यात प्लाझ्मा दान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. लाईफलाईन रक्तपेढीकडून सहकार्याची मदत मागितली. रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांनी प्रशासनाची आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता सामाजिक जाणिवेतून विनामूल्य सेवा देण्यास पुढाकार घेतला. त्यांनी १४ व १५ डिसेंबर रोजी पात्र प्लाझ्मा दाते निवडून २७७ कोविड आजारातून बरे झालेल्या व्यक्तींच्या आरबीडी अँटीबॉडी रक्त तपासणी केली. त्यानंतर निवड झालेल्या ९६ लोकांनी प्लाझ्मा दान केले. हे शिबिर सलग सहा दिवस चालले. सोबतच या महामारीदरम्यान असलेल्या रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी ६२ जणांनी नियमित रक्तदानही केले.
या शिबिरामध्ये बहुतेक शासकीय कर्मचाऱ्यांनी भाग घेतला, ज्यात प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग, आरोग्य विभाग यांचा समावेश होता, तसेच समाजातील काही नागरिकांनीही हातभार लावला.