नागपूर : मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या ७५ वर्षीय आजीचे हिमोग्लोबीन ३ ते ४ वर आले होते. रक्त देणे गरजेचे होते. परंतु आजीला दुर्मीळ ‘बॉम्बे’ रक्तगटाची गरज होती. नागपुरात ते उपलब्ध नव्हते. आजीची प्रकृती अत्यवस्थ झाली. याची माहिती सेवा फाउण्डेशनला मिळताच त्यांनी ‘बॉम्बे’ रक्तगट दात्याचा शोध घेऊन रक्त उपलब्ध करून दिले. माणुसकी धावून आल्याने आजीचा जीव वाचला.
अंजनाबाई गोहाने त्या आजीचे नाव. अंजनाबाई या मध्य प्रदेशातील एका छोटाशा गावातील रहिवासी. प्रकृती खालावल्याने त्या नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल झाल्या. डॉक्टरांनी त्यांची चाचणी केल्यानंतर हिमोग्लोबीन ३ ते ४ वर आले होते. यामुळे तातडीने रक्त देण्याचा निर्णय घेतला. परंतु आजीच्या रक्ताची तपासणी केली असता त्यांचा रक्तगट दुर्मीळ गटातील होता. याला ‘बॉम्बे’ रक्तगट म्हणतात. गरीब अंजनाबाई यांच्या मुलासमोर या रक्तगटाचे रक्त कुठे मिळेल हा प्रश्न होता. अखेर त्याने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने सेवा फाउंडेशनला सहकार्य करण्याची विनंती केली. फाउंडेशनचे कार्यकर्ते राहुल, खंडाते व भोसले कामाला लागले.
मुंबई येथून रक्तपिशवी आणण्यात वेळ जाणार होता. यामुळे कार्यकर्त्यांनी नागपुरातच बॉम्बे रक्तगटाचा दाता शोधण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर सोनझरी वस्तीतील भगत सिंह मडावी दाता मिळाला. त्याला परिस्थितीची जाणीव करून देताच तो तयार झाला. हेडगेवार रक्तपेढीत जाऊन त्याने रक्तदान केले. हेडगेवार रक्तपेढीने हे रक्त मेडिकलला उपलब्ध करून दिले. आजीला वेळेवर रक्त मिळाल्याने तिचा जीव वाचला. या संपूर्ण प्रक्रियेत प्रीतिश अमले, प्रमिला शेटे व डॉ. हर्षा सोनी यांचे विशेष सहकार्य मिळाले.