नागपूर: मायानगरी मुंबई आणि अंडरवर्ल्डमध्ये ज्याची कधी काळी प्रचंड दहशत होती. ज्याच्या नावानेच चांगल्या चांगल्यांना घाम फुटायचा. त्या अंडरवर्ल्ड डॉनचा बीपी एका परप्रांतिय गुन्हेगाराने चांगलाच वाढवला होता. कट्टर शत्रू दाऊद ईब्राहिम अर्थात डी गँगशी हा गुन्हेगार संबंधित असल्याने तो आपली सुपारी घेऊनच कारागृहात आला असावा, असा संशय 'डॉन'ला आला. त्यामुळे तो कारागृहातून बाहेर जाईपर्यंत 'डॉन' कमालीचा अस्वस्थ होता.
उत्तर प्रदेशातील माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची प्रयागराजमध्ये शनिवारी रात्री पोलीस आणि पत्रकारांच्या समोरच तिघांनी गोळ्या घालून हत्या केली. या हत्याकांडाने मोठमोठ्या गुन्हेगारांची धडधड वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूरच्या कारागृहात बंदीस्त असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी संबंधातील किस्सा आज पोलीस आणि गुन्हेगारी वर्तुळात चर्चेला आला आहे. कर्नाटकातील कुख्यात गुन्हेगार जयेश कांथा उर्फ शाकिर याचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (डी कंपनी) तसेच दहशतवादी अफसर पाशाशी संबंध असल्याची चर्चा आहे. शाकिरने बंगरुळू कारागृहात असताना जानेवारी ते मार्च अशा दोन वेळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन केला.
१०० कोटींची खंडणी मागून त्याने गडकरी यांना धमकीही दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून नागपुरात आणले. दरम्यान, त्याला एक दिवसासाठी न्यायालयीन कस्टडीत कारागृहात पाठविण्यात आले. तो कारागृहात पोहचण्यापूर्वीच त्याची संपूर्ण कुंडली येथील कारागृहात बंद असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याला माहित झाली होती. जयेश उर्फ शाकिर लष्कर ए तोयबा आणि पीएफआयसोबतच डी कंपनीसाठीही काम करतो, हे कळाल्याने डॉन अस्वस्थ झाला होता. डी कंपनीकडून तो आपली सुपारी घेऊनच कारागृहात आला असावा, असाही संशय 'डॉन'ला वाटत होता. त्यामुळे डॉनने आपल्या साथीदारांच्या मदतीने स्वत:ला अंडरकव्हर करून घेतले. जेल कॅन्टीनमध्ये शहानिशाखास सूत्रांच्या माहितीनुसार, शाकिर कारागृहात पोहचल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 'डॉन'ने जेल कॅन्टीनमध्ये शाकिरला गाठले. 'तू डी कंपनीका आदमी है. मेरी सुपारी लेकर अंदर आया क्या' अशी थेट विचारणा केली. शाकिरने नाही म्हटल्यानंतर डॉनचे काहीसे समाधान झाले. त्यानंतर डॉनने शाकिरला ज्यूस आणि सिगारेट पाजल्याचीही माहिती आहे. शाकिर कारागृहातून बाहेर गेल्यानंतर 'डॉन'ची अस्वस्थता संपल्याचे सांगितले जाते.
गुन्हेगारांचे स्ट्राँग नेटवर्कमोठ्या गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागते. मात्र, मोठ्या गुन्हेगारांना गुन्ह्यांची आणि त्यात सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांची माहिती मिळवण्यासाठी फारसे परिश्रम घ्यावे लागत नाही. कोणता गुन्हा कुणी केला, तो गुन्हेगार कोणत्या टोळीशी संबंधित आहे, त्याच्यावर किती गुन्हे आहेत, ती माहिती मोठ्या गुन्हेगारांना लवकरच मिळते. कुख्यात जयेश उर्फ शाकिर सेंट्रल जेलमध्ये पोहचण्यापूर्वीच डॉन गवळीला त्याची ईत्यंभूत माहिती मिळाली. तो दाऊदशी संबंधित आहे, हे सुद्धा कळले. त्यावरून गुन्हेगारांचे नेटवर्क किती स्ट्राँग असते, त्याची प्रचिती यावी.