नागपूर : नागपुरात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रस्ते आणि उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या क्रमांतर्गत वंजारीनगर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून बरेच काम झाले आहे. पण अजनी मेन रोडकडे असलेला उड्डाणपुलाचा उतार लोकांच्या चिंतेचा विषय बनला आहे.
उड्डाणपुलाचा उतार अजनी रोडवर ज्याप्रकारे जोडला जात आहे, त्यामुळे अपघाताची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचा अजनी रोडकडील उतार अपघात स्थळ बनणार नाही ना, अशी लोकांमध्ये भीती आहे. उड्डाणपूल अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने तयार करण्यात येत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे वाहनचालकांना काहीही त्रास होणार नाही.
लोकमतने निर्माणाधीन वंजारीनगर उड्डाणपुलाची पाहणी केली. रेल्वे मेन्स शाळेजवळ अजनीच्या मुख्य रस्त्याला उड्डाणपुलाचा उतार जोडण्यात आला आहे. उतारापासून रस्त्याचे अंतर फारच कमी आहे. रस्ता उड्डाणपुलाला जोडल्याचे दिसून येत आहे. उड्डाणपुलावरून कोण येत आहे, याचे आकलन मेडिकलकडून येणाऱ्या वाहनचालकाला करणे कठीण होणार आहे. ही जागा दुर्घटना स्थळ होऊ शकते, असे काही वाहनचालकांचे मत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कंत्राटदारातर्फे वंजारीनगर उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. वंजारीनगर पाण्याच्या टाकीजवळील परिसर बांधकामामुळे बंद ठेवण्यात आला आहे. पण अजनी मेन रोडच्या दिशेने उड्डाणपुलाचा उतार पाहून वाहनचालक चिंतित आहेत.
वाहतूक सिग्नल लागणार
योजनाबद्ध पद्धतीने उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. भविष्यात वाहनचालकांना कसलीही अडचण होणार नाही. अजनी रोडच्या उतारावर सिग्नल लावण्यात येणार आहे. त्याकरिता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. संबंधित विभागासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- वैशाली गोडबोले, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, डिव्हिजन-३.