लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुम्ही घाबरू नका, पोलीस तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, वेळ आणि स्थळ कोणतेही असू द्या. रात्री-बेरात्री तुम्ही कधीही फक्त एक फोन करा. तुम्हाला त्रास देणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू. तुम्हालाच नव्हे तर तुमच्या आजूबाजूच्यांना कुणालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही आम्हाला कळवा. तुम्ही घाबरू नका, तुमचे नामही गुप्त ठेवण्यात येईल, ही हमी आणि विश्वास शहर पोलीस दलाने नागपूरातील तमाम महिला-मुलींना दिला आहे.हिंगणघाट जळीतकांडाने देशभरातील महिला-मुली पुन्हा एकदा थरारल्या आहेत. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी महिला-मुलींना आश्वस्त करण्याचा प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे. ‘तुम्ही हाक द्या, आम्ही साद देऊ’ अशा प्रकारचा हा उपक्रम आहे.हिंगणघाट जळीतकांडामुळे महिला-मुलींच्या सुरक्षेचा विषय पुन्हा नव्याने ऐरणीवर आला आहे. या विषयाच्या संबंधाने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. सर्वत्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असताना पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी महिला-मुलींना आश्वस्त करण्याच्या संबंधाने उपाययोजना आखल्या आहेत. त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांसोबतच गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभाग, भरोसा सेल, दामिनी पथकाला अधिक सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत. महिला-मुलीची मदतीसाठी कुठूनही हाक आली तर तिला तात्काळ मदत करा, असे सांगून त्यांच्यातील विश्वास अधिक बळकट करण्यासंबंधी पोलीस आयुक्तालयातर्फे पोस्टरच प्रकाशित केले आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर सर्वत्र व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये पोलिसांनी केवळ महिला-मुलीच नव्हे तर तमाम नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.व्हायरल झालेल्या या पोस्टरमध्ये पोलिसांनी महिला-मुलींना म्हटले आहे की, तुम्हाला कुणी धमकावत असेल, टोमणे मारत असेल, येता जाता छेड काढत असेल, रस्त्यात अडवून बोलण्याचा प्रयत्न करत असेल, मोबाईलवर मेसेज, फोन करून त्रास देत असेल, पाठलाग करीत असेल किंवा कुणी कोणताही त्रास देत असेल तर आमच्याशी संपर्क साधा ! तुमचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. अशी हमीही या पोस्टरमधून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी शहर पोलिसांनी होम ड्रॉप योजना सुरू केली. रात्रीबेरात्री कुणी महिला-मुलगी कुठे अडकली असेल तर तिने पोलिसांना १०० क्रमांकावर फोन करायचा. तिला तिच्या घरी सुखरूप सोडून देण्याची जबाबदारी पोलीस पार पाडतील, अशी ही योजना होती.माझे शहर, माझे कुटुंब : पोलीस आयुक्तहे शहर माझे कुटुंब आहे. या कुटुंबातील महिला- मुलींच्या सुरक्षेला पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. दुसरीकडे काही भयावह झाले की आमच्या कुटुंबात त्याची चर्चा होते अन् सुरक्षेचा विषयही चर्चेला येतो. हिंगणघाटची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. मात्र, आमच्या शहरात अशा घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रयत्नाची पराकाष्ठा करतील, अशी हमी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी या संबंधाने लोकमतशी बोलताना दिली. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास मोठी घटना घडते. त्यामुळे गुन्हा टाळण्यासाठी महिला-मुलींना त्रास होत असेल तर त्यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले.येथे करा संपर्क !पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा - ९४२३२५२२०७, पोलीस निरीक्षक भरोसा सेल ०७१२- २२३३६३८, ८३०८८२७३४३, सामाजिक सुरक्षा विभाग : ९५१८५४४२१६पोलीस नियंत्रण कक्ष १०० / ०७१२ २५६१२२२
तुम्ही घाबरू नका, पोलीस आहेत तुमच्या पाठीशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 11:03 PM
तुम्ही घाबरू नका, पोलीस तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, वेळ आणि स्थळ कोणतेही असू द्या. रात्री-बेरात्री तुम्ही कधीही फक्त एक फोन करा. तुम्हाला त्रास देणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू.
ठळक मुद्देमहिला-मुलींना आश्वस्त करण्याचा प्रयत्न : कोणताही त्रास होत असेल तर संपर्क करण्याचे आवाहन