नागपूर : लसीकरण झाले म्हणजे आपल्याला कोरोना होणार नसल्याच्या भ्रमात राहू नका. मागील १४ दिवसांत ५४ पैकी दोन्ही डोस घेतलेल्या ३४ म्हणजे, ६३ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. शहरात लसीकरणाची मोहीम सुरू होऊन १० महिने होत आहेत.
आतापर्यंत १७ लाख ९५ हजार ३८१ लोकांनी पहिला डोस घेतला, तर १० लाख ६६ हजार ३८४ लोकांनी दोन्ही डोस घेतले. यात सर्वाधिक लसीकरण १८ ते ४४ या वयोगटात झाले. ४ लाख ८४ हजार ४५१ तरुणांचे संपूर्ण लसीकरण झाले. त्याखालोखाल ४५ ते ५९ वयोगटातील २ लाख ८१ हजार २९६ तर ६० वर्षांवरील १ लाख ८७ हजार ७९९ लोकांनी दोन्ही डोस घेतले. परंतु जवळपास २८ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात आतापर्यंत ५० टक्केही संपूर्ण लसीकरण झाले नसल्याचे चित्र आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी संसर्ग पसरल्यास याचा सर्वाधिक फटका लसीकरण न झालेल्यांना बसू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-बाधितांमध्ये दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक
१ ते १४ नोव्हेंबर दरम्यान शहरात ५४ लोकांना कोरोनाची लागण झाली. यात दोन्ही डोस घेतलेले ३४ रुग्ण, एकच डोस घेतलेले ५ रुग्ण तर लसीकरण न झालेले ९ रुग्ण आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या केवळ एका रुग्णाला गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून आली. परंतु आता त्याचीही प्रकृती सुधारत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उर्वरित ६ रुग्ण हे १८ वर्षांखालील आहेत.
- लसीकरण झाले तरी खबरदारी आवश्यक
कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी संसर्ग संपलेला नाही. दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये बेफिकिरी वाढल्यामुळेच त्यांच्यात कोरोनाचा संसर्ग अधिक झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी तातडीने लस घ्यावी.
- डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी मनपा
कालावधी : १ ते १४ नोव्हेंबर
बाधित रुग्ण : ५४
दोन्ही डोस झालेले रुग्ण : ३४
एकच डोस झालेले रुग्ण : ५
लसीकरणच न झालेले रुग्ण : ९
१८ वर्षांखालील रुग्ण : ६