कोलकाता : महाराष्ट्र व बिहारमध्ये आपण काँग्रेससोबत आघाडीचे घटक आहात. तेव्हा, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराला येऊ नका, अशी विनंती काँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांना एका पत्राद्वारे केली आहे.
पाच राज्यांपैकी केवळ आसाममध्येच भाजप सत्तेत येईल, असे भाकीत करणारे शरद पवार प.बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत, तर केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडीसोबत आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस अन्य पक्षांसोबत आघाडी करून सत्ताधारी पक्षाविरोधात लढत आहे. महाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यांमध्येही भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची आघाडी बनविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
अशावेळी आपण ममता बॅनर्जी यांच्या म्हणजेच काँग्रेसविरोधात प्रचाराला आलात तर मतदारांमध्ये संभ्रम तयार होईल. तेव्हा बंगालमध्ये शक्यतो प्रचार टाळावा, अशी विनंती प्रदीप भट्टाचार्य यांनी पवार तसेच तेजस्वी यादव यांना एका पत्राद्वारे केली आहे.