नागपूर : शेतकऱ्यांना सिंचनासाठी विजेची आवश्यकता भासते, परंतु अनेकदा वीज उपलब्ध होत नाही. विजेसाठी शेतकऱ्यांनी वीज मंडळ किंवा सरकारवर अवलंबून राहूच नये. त्याऐवजी सौर कृषी पंपांच्या माध्यमातून विजेची समस्या सोडवावी, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. विदर्भ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
शेतकऱ्याना पाणी २४ तास उपलब्ध होण्यासाठी जलसंधारणाची कामे गावांमध्ये केली पाहिजेत. नाल्यांचे खोलीकरण व तलावांमधील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढविली तर पाणी उपलब्ध होईल. यासाठी गावातले पाणी गावात, शेतातले पाणी शेतात, घरातले पाणी घरातच मुरले पाहिजे. प्रत्येकाने वरीलप्रमाणे प्रयत्न केला तर विहिरींना २४ तास पाणी उपलब्ध होईल. सामूहिक माध्यमातून किंवा शासनाच्या मदतीने असे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले.
ठिबक सिंचन व ग्रीन हाऊस या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले उत्पादन दर्जेदार करावे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, मात्र त्यात शॉर्टकट मारू नये. उत्पादनाच्या दर्जाशी कोणतीही तडजोड करू नये. आगामी काळात सेंद्रिय शेती किंवा रासायनिक शेती दोन्हीचा वापर करून उत्पादन वाढवा आणि पिकाचा दर्जा चांगला ठेवा. शेतकऱ्याला आपल्या वस्तू निर्यात करायच्या असतील तर मालाचा दर्जा चांगले, आकर्षक पॅकेजिंग, वेळेवर डिलिव्हरी या गोष्टी कराव्या लागतील, असे गडकरी म्हणाले. यावेळी डॉ. सी. डी. मायी, मोरेश्वर वानखेडे, ठाकरे व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.