लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अंमलबजावणी योग्य आराखडा तयार करण्याचे निर्देश सोमवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. मनपा, पोलीस वाहतूक विभाग आणि संबंधित विभागांनी समन्वयातून हा आराखडा लवकरच तयार केला जाणार आहे.
नागपूर शहर व लगतच्या परिसरातील वाहतूक व पार्किंग प्रश्नाचा अभ्यास, त्यावर परिणामकारक व दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक नुकतीच पार पडली. नागपूर शहरात विविध शासकीय यंत्रणांकडून वाहतुकीशी संबंधित सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले होते. त्या अनुषंगाने मनपा मुख्यालयात बैठक घेण्यात आली.
मनपा लोककर्म विभागाचे अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, वाहतूक उपअभियंता श्रीकांत देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, नागपूर मेट्रोचे महेश गुप्ता यांच्यासह पोलीस वाहतूक विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून वाहतूक व्यवस्थेची माहिती घेतली. रस्त्याच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे असलेली यंत्रणा, वाहतूक सिग्नल वारंवार बंद पडणे, टोइंग वाहनांची सद्यस्थिती याचा आढावा घेतला.
....
सिग्नलसाठी आधुनिक यंत्रणा वापरा
नागपूर शहरातील रस्त्यांवर अथवा शहर वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भात, तसेच अन्य ठिकाणी केेंद्र वा राज्य यंत्रणांमार्फत सुरू असलेली कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करा, आधुनिक पद्धतीने सिग्नलवर नियंत्रण ठेवून उपाययोजना करण्याचे असे निर्देश आयुक्तांनी दिले.
...
अनधिकृत पार्किंगवर कारवाई करा
शहरात चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे अनेक ठिकाणी अनधिकृतपणे पार्किंग होत असते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टनुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र, पोलीस विभागाकडे आधुनिक टोइंग व्हॅन उपलब्ध नसल्याने कारवाई करणे कठीण जाते. यासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याबाबतच्या करार करण्याचे निर्देश दिले.
.......
पोलीस आयुक्तांकडे बैठक होणार
सिग्नलवर वाहतूक पोलिसांतर्फे दोन कर्मचारी नियुक्त केलेले असतात, तर मनपा कंत्राटदारांच्या माध्यमातून झोननिहाय सिग्नलची दुरुस्ती करीत असते. यापुढे आधुनिक पद्धतीने सिग्नलवर नियंत्रण ठेवून उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी पोलीस आयुक्तांकडे बैठक लावण्याची सूचना आयुक्तांनी केली. ट्राफिक सिग्नल सिंक्रोनायझेशनबाबतही आयुक्तांनी यावेळी आढावा घेतला.