अॅप डाऊनलोड करताच बँक खाते साफ
-सायबर सेलकडे एक डॉक्टर तक्रार घेऊन आले. त्यांना कामावर असताना एका भामट्याचा फोन आला. आम्ही मोबाईल कंपनीतून बोलत असून थोड्याच वेळात तुमचा मोबाईल बंद पडणार असल्याची माहिती दिली. त्यांना क्विक सपोर्ट नावाचे अॅप डाऊनलोड करावयास सांगितले. त्यांनी अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना अॅपवरून रिचार्ज करण्यास सांगितले. त्यांनी रिचार्ज करताच त्यांच्या बँक खात्यात असलेले २३ हजार रुपये उडविण्यात आले.
या आमिषापासून राहा सावध
-अनेकदा नागरिकांना फेक मेसेज येतात. तुम्हाला ७० लाखांची लॉटरी लागली आहे, अशी बतावणी करण्यात येते. त्यानंतर त्यांना लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लाखो रुपये अकाऊंटमध्ये टाकण्यास सांगण्यात येते. संबंधित व्यक्तीकडून लाखो रुपये मिळाल्यानंतर हे भामटे त्याच्याशी आपला संपर्क तोडतात. तर अनेकदा तुम्हाला फ्री गिफ्ट मिळणार आहे असे सांगून मेसेज पाठवितात. मेसेजमधील लिंकला क्लिक केले की बँक खात्यातील रक्कम सायबर गुन्हेगार वळती करतात. त्यामुळे अशा आमिषापासून सावध राहण्याचे आवाहन सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
-यांच्या प्रमाणे तुम्हीही फसू शकता
१) न्यू नरसाळा येथील सुरेश सोनवणे या ४१ वर्षांच्या नागरिकाला लॉकडाऊनमध्ये लोनची गरज होती. ते ऑनलाईन लोन मिळते का याची माहिती घेत होते. त्यांना गुगलवर एक मोबाईल क्रमांक मिळाला. कोटक महिंद्राच्या नावाने हा नंबर होता. त्यांनी सोनवणे यांची माहिती विचारली. त्यांचे कागदपत्र व्हॉट्सअॅपवर मागितले. आम्ही तीन लाखांचे पर्सनल लोन लगेच मंजूर करीत असल्याचे सांगितले. त्यासाठी लिंक पाठवून टीम व्हिवर अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याचा ओटीपी मागून बँकेतील १६ हजार रुपये काढून घेतले.
२) सीताबर्डी येथील सताभ सुमन या २६ वर्षांच्या युवकाने लोन मिळविण्यासाठी ऑनलाईन सर्च केले. त्याला आदित्य बिर्ला कॅपिटल नावाने एक मोबाईल नंबर मिळाला. त्या नंबरवर संपर्क साधला असता समोरच्या व्यक्तीने एनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करायला सांगितले. अॅप डाऊनलोड केल्यानंतर सायबर गुन्हेगाराने त्याला ओटीपी मागितला आणि ओटीपी देताच त्याच्या खात्यातील ३५९९ रुपये सायबर गुन्हेगाराने उडविले. खात्यात कमी रक्कम असल्यामुळे हा युवक बचावला.
अॅप डाऊनलोड करताना काय काळजी घ्यावी
-एखाद्याने लिंक पाठवून एनी डेस्क नावाचे अॅप किंवा क्विक सपोर्ट अॅप व त्यासारखे इतर अॅप डाऊनलोड करण्यास सांगितल्यास ते करु नये. असे अॅप डाऊनलोड केल्यास सायबर गुन्हेगार आपल्या मोबाईलच्या रिमोटने ताबा घेतात. त्याचा ओटीपी मागतात. ओटीपी दिल्यानंतर आपल्या मोबाईलचा ताबा समोरच्या व्यक्तीकडे जातो. त्यामुळे असे अॅप डाऊनलोड करू नका. अॅप कशाबद्दल आहे याची खातरजमा करूनच ते डाऊनलोड करणे महत्त्वाचे आहे. एसएमएसचे अॅप डाऊनलोड केल्यास मोबाईलवर येणारे मेसेज सायबर गुन्हेगाराला दिसतात. हे अॅप डाऊनलोड केल्यास येणारा ओटीपी समोरच्या व्यक्तीला दिसतो आणि आपल्या बँकेचे आर्थिक व्यवहार तो करु शकतो. सायबर गुन्हेगार संबंधित व्यक्तीच्या नावाने लोनही काढू शकतो.
खातरजमा करूनच अॅप डाऊनलोड करा
‘कमी टक्के व्याजदराने कर्ज देतो असा मेसेज आल्यास त्याची बँकेत जाऊन खात्री करा. मेसेजमध्ये सांगितलेले अॅप डाऊनलोड करू नये. अशी ऑनलाईन स्कीम आहे का याची विचारपूस करावी. ऑनलाईन पैसे देतो असे म्हणणाऱ्याचे कार्यालय आपल्या शहरात आहे का याची खातरजमा करावी. तेथे जाऊनच कायदेशीर मार्गाने व्याजाची रक्कम मिळवावी. अन्यथा आमिष दाखवून येणाऱ्या मेसेजवरून लोन घेण्याचा प्रयत्न केल्यास फसवणूक होऊ शकते.’
-केशव वाघ, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन
..........