आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: टॅब लॉक करण्यासबंधीच्या अपप्रचारांना विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर मार्फत महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांना जेईई/नीट/एमएचटी-सीईटी परीक्षा प्रशिक्षणासाठी मोफत टॅब वाटप ही माहाज्योतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत दररोज ६ जीबी डेटा देण्याचाही समावेश आहे.
२०२३ च्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी परीक्षा प्रशिक्षणा करीता विद्यार्थ्यांना मोफत टॅब वितरीत करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी टॅबचा वापर पुर्णत: अभ्यासाकरीता करावा यासाठी टॅबला एडमिनिस्ट्रेटिव पासवर्ड लावण्यात आला होता. ६ जून रोजी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपल्याने टॅबमधील एडमिनिस्ट्रेटिव पासवर्ड अनलॉक करण्याकरीता सबंधीत कंपनीला कळविण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांनी याबाबत कोणताही संभ्रम किंवा गैरसमज बाळगू नये, असे महाज्योतीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.