नागपूर - बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत नागपूरमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने याबाबत पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. एवढेच नाही, तर याप्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्यास आपण न्यायालयात जाऊ, असेही समितीचे श्याम मानव यांनी म्हटले आहे. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनीही पलटवार करत, 'मी आपले आव्हान स्वीकारतो. श्याम यांनी येथे रायपूरला यावे, तिकिटाचे पैसे मी देईन, असे म्हटले होते. आता, श्याम मानव यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र शास्त्रींना चॅलेंज दिलं आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी अंनिसच्या आरोपावर प्रत्युत्तर देत म्हटले की, आरोप करणारे लोक संकुचित मानसिकतेचे आहेत. आम्ही केवळ 7 दिवसांचीच कथा करतो. आम्ही आपली समस्या सोडवू, असा दावा कधीही करत नाही. जे आमचे इष्ट आहेत, त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही अंधश्रद्धेच्या बाजूने नाही. आमचे इष्टच लोकांची समस्या दूर करतात. हनुमानजींची पूजा करणे आणि प्रचार करणे चुकीचे आहे का?, असा प्रतिसवाल शास्त्रींनी केला होता. तसेच, अंनिसचे ३० लाख रुपयांचे चॅलेंजही त्यांनी स्वीकारले होते. त्यासाठी, श्याम मानव यांनी दरबारात बोलावले होते. आता, अंनिसने पुन्हा एकदा शास्त्रींना चॅलेंज दिलं असून भक्तांच्या आड काय लपून बसता, हिंमत असेल तर नागपुरात या, असे आव्हान दिलं आहे.
'तुमच्याकडे दिव्यशक्ती असेल तर तुम्ही नागपूरला या, रायपूरला बोलवून भक्तांच्या आड कशाला लपता, धमक असेल तर नागपुरात येऊन तुमची शक्ती सिद्ध करा' असे चॅलेंज बागेश्वर बाबांना श्याम मानव यांनी दिले आहे. तसेच, बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्रींनी नागपुरात येऊन दिव्यशक्ती असल्याचे सांगितले होते. भक्तांसमोर विविध चमत्कार दाखवल्याचा दावा केला. तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल सर्व माहिती चेहरा बघून सांगितल्याचा दावा केला. कोणाच्या घरी काय ठेवले आहे, कुठे ठेवले आहे, हेही सांगितले. त्यामुळे त्यांना नागपुरात येऊन 'दिव्यशक्ती' सिद्ध करण्याचे चॅलेंज दिल्याचेही मानव यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे.
शास्त्रींनी स्वीकारले 30 लाख रुपयांचे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आव्हान देत, चमत्कार दाखवा, खरे ठरले तर आणि त्यांना 30 लाख रुपये देऊ. पण ते आव्हान स्वीकारण्यापूर्वीच 2 दिवस आधीच कथा संपवून निघून गेले. मात्र, धीरेंद्र शास्त्री यांनी श्याम मानव यांचे आव्हान स्वीकारले होते. पण, आता नागपुरात येऊन ते आव्हान स्विकारावे असे चॅलेंज अंनिसने दिले आहे. तसेच, धीरेंद्र कृष्ण यांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही समितीच्या वतीने करण्यात आली आहे.