नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारविदर्भातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत. त्याठिकाणी तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचेही पवार म्हणाले. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, मराठवाडा विदर्भ महाराष्ट्राच्या इतर भागातील अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती असून शेतकरी व्याकूळ झालेला आहे. याबाबत आम्ही काहीतरी सांगितलं, विचारणा केली तुम्ही मंत्रिमंडळात किती जण होते? अशी उत्तरं दिली जातात. हे काही समस्येवरील उत्तर नाही. तर, नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीने कसे सुरू होतील, त्यांना मदत कशी होईल, अशी उत्तरं दिली पाहिजेत. त्यांना दुबार पेरणी करायची असेल तर बियाणं परत कसं मिळेल हे त्याचं उत्तर पाहिजे. या समस्यांचं कोणी बोलतच नाही, असे पवार म्हणाले. फक्त वरवर घोषणा नको. कृती झाली पाहिजे. अजून शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झाले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
मी राजकारण करण्यासाठी हा दौरा करत नाही. विरोधकांची भूमिका महत्वाची असते. या दौऱ्याच्या माध्यमातून दुसऱ्यांनी निवेदन देऊन त्यावर आपण बोलणं आणि आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आपल्याला त्यातील बारकावे समजतात. ते प्रश्न सभागृहात चांगल्या पद्धतीनं मांडता येतात. आपण तहान लागल्यानंतर विहीर खोदत नाही. आधीच विहीर खोदून ठेवतो असेही ते म्हणाले. वेगवेगळ्या समस्या घेऊन लोक भेटत आहेत. तसेच काही लोकांवर नवीन जबाबदारी सोपवली आहे. ते लोक देखील भेटी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.