काटोल : काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक फळगळतीने हवालदिल झाला आहे. उपलब्ध औषध फवारणी करूनही फळगळती थांबत नसल्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा, याकडे लक्ष वेधणारे वृत्त लोकमतने गत शनिवारी प्रकाशित केले होते. याच दिवशी काटोल येथे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांची काटोल येथे आढावा बैठकी झाली. तीत शेतकऱ्यांनी फळगळतीकडे केदार यांचे लक्ष वेधले होते. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी केदार यांनी सोमवारी (दि. २३) रोजी नागपूर येथे कृषी विभागाची बैठक घेतली.
या बैठकीत फळगळतीवर उपाययोजना करण्यासंदर्भात मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर गत तीन दिवसांपासून काटोल आणि नरखेड तालुक्यात कृषी विभागाचे अधिकारी व तज्ज्ञ फळ बागा अक्षरशः पिंजून काढताना दिसून येत आहे. या फळगळतीचे कारण वातावरणातील बदल व कमी पाऊस तसेच योग्य प्रकारे खत पुरवठा न झाल्याने असल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र फळगळ गत चार वर्षांपासून सुरू आहे. यंदा हिरवे फळसुद्धा गळती होऊन पडत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वच प्रकारचे औषध फवारणी आतापर्यंत करण्यात आली. परंतु गळ थांबली नसल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. यासोबतच वातावरण एवढा कोणता मोठा बदल झाला असा प्रश्नसुद्धा शेतकरी यावेळी विचारताना दिसून आले. यावर संशोधक मात्र निरुत्तर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कृषितज्ज्ञांनी बागांचे निरीक्षण करण्यासोबतच संत्रा-मोसंबीची गळती कशी थांबविता येईल, यावर तातडीने उपायोजना सांगाव्यात, अशी मागणी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे. या पाहणी दौऱ्यात कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, कृषी महाविद्यालयाचे डॉ. रमाकांत गजभिये, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ डॉ. मोहन पाटील, कीटक शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दवणे, डॉ. योगेश धार्मिक, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ डॉ. एकता बागडे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, शेतकऱ्यांच्या वतीने डॉ.अनिल ठाकरे, प्रगतिशील शेतकरी दिनेश ठाकरे, मनोज जवंजाळ उपस्थित होते.
---
संत्रा व मोसंबीच्या उत्पादकांना दोन्ही बहरात फळगळतीचा सामना करावा लागत आहे. यंदाही हीच परिस्थिती आहे. औषध फवारणी करूनही तोडगा निघत नाही. कृषी विभागाचे अधिकारी फळगळ पाहणी करीत आहे. त्यांनी यावर तातडीने उपाययोजना सुचवाव्यात.
- ज्ञानेश्वर मुळेकर, शेतकरी
260821\img-20210825-wa0213.jpg
तालुक्यातील संत्रा बागायतीतील फळगळीची पाहणी करतांना कृषी संशोधक