प्रतिबंधित मोमिनपुऱ्यातील कुणालाही बाहेर पडू देऊ नका : हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:21 PM2020-05-15T22:21:24+5:302020-05-15T22:26:06+5:30
कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असलेल्या मोमिनपुरा येथील बकरा व्यापारी व अन्य व्यक्तींना शहराच्या इतर भागात जाऊ देऊ नका, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असलेल्या मोमिनपुरा येथील बकरा व्यापारी व अन्य व्यक्तींना शहराच्या इतर भागात जाऊ देऊ नका, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना दिला.
मोमिनपुरा येथे कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी १२ एप्रिल २०२० रोजीच्या आदेशाद्वारे मोमिनपुºयाला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. परिणामी, या क्षेत्रातील नागरिक बाहेर जाऊ शकत नाहीत व बाहेरचे नागरिक या क्षेत्रात प्रवेश करू शकत नाहीत. असे असताना महानगरपालिका उपायुक्तांनी ४ मे २०२० रोजी वादग्रस्त आदेश जारी करून मोमिनपुरा येथील बकरामंडी वाठोडा येथे स्थानांतरित केली आहे. ही जागा सरकारी क्वारंटाईन सेंटर असलेल्या सिम्बॉयसिस कॉलेजच्या जवळ आहे. परिणामी, या वादग्रस्त आदेशाविरुद्ध वाठोडा येथील उमेश उतखेडे, कृष्णा मस्के व दिनेश येवले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणावर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने वरील अंतरिम आदेश दिला. तसेच, राज्य सरकार, पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून याचिकेवर उत्तर सादर करण्यास सांगितले. नियमानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींना त्या क्षेत्राच्या बाहेर जाता येत नाही. त्यामुळे मनपा उपायुक्तांचा आदेश मनपा आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करणारा आहे. मोमिनपुऱ्यातील बकरामंडी वाठोड्यात स्थानांतरित केल्यास या भागात कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. कार्तिक शुकुल तर, महानगरपालिकेतर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.