लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गृहविलगीकरणातूनही कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. म्हणून नागरिकांनी गृहविलगीकरणात राहण्याचा धोका पत्करू नये. कोरोनाची लक्षणे दिसून येताच गृहविलगीकरणात न राहता थेट रुग्णालयात दाखल व्हावे, असे मत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी व्यक्त केले. बुधवारी माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या की, घरात विलगीकरणासाठी आवश्यक सोय नाही. अनेकांच्या घरी वेगळी सोय नाही. एकाला लागण झाल्यास इतरांना कोरोना होण्याचा धोका आहे. त्यामुळे संशयितांनी घरी न राहता रुग्णालयात दाखल व्हायला पाहिजे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. ग्रामीण भागातील रुग्णालयात व्यवस्था आहे. प्रकृती गंभीर झाली की त्याला शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. ग्रामीण भागात कोरोना केंद्र तयार होणार असून, बालकोविड केंद्रसुद्धा तयार करण्यात येणार आहे. सध्या शहरी भागातील संदर्भातच बालकोविड केंद्राचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील कोरोना केंद्र सीएसआर फंडातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाऊस बऱ्यापैकी झाला नसल्याने डेंग्यूचे रुग्ण समोर आले. याच्या नायनाटासाठी आवश्यक उपाय केले पाहिजे. डायरिया होण्याचा धोका असल्याने त्याच्या नियंत्रणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आशा सेविकांच्या माध्यमातून ओआरएसचे पॅकेट वाटप करण्यात येत असून, जनजागृतीही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.
- अधिक किमतीने मुद्रांक विकणाऱ्यांवर कारवाई करणार
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुद्रांक अधिक किमतीने विकले जात असल्याची बाब पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा असे करणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी आर. विमल यांनी सांगितले.