नागपूर : ‘कोरोना’च्या पहिल्या दोन लाटांमध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या होत्या. ‘ओमायक्रॉन’बाबत जनतेने अफवा पसरविणे टाळले पाहिजे. यासंदर्भात व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे, असे मत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी व्यक्त केले. ‘सोशल मीडिया’ विश्लेषक अजित पारसे यांनी तयार केलेले जनजागृतीपर स्टीकर्स व भित्तीपत्रकाचे जिल्हाधिकाऱ्यांनी लोकार्पण केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर अफवा, अर्धवट माहितीची पेरणी झाली. अफवांमधून नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमातून अनेकांना योग्य उपचार मिळू शकले नाही. यामुळेदेखील काही बळी गेले. प्रशासनाची पूर्ण ताकद त्यावेळी कोरोनाविरुद्ध लढण्यात होती. या अफवांवर नियंत्रण ठेवणे कठीण गेले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत असे होऊ नये यासाठी ‘नो अफवा @ ओमायक्रॉन कॅम्पेन’ ही मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या मोहिमेला हिरवी झेंडी दाखवली. याचेच जिल्हाधिकाऱ्यांनी लोकार्पण केले. यावेळी पोलिस उपायुक्त बसवराज तेली उपस्थित होते. ही मोहीम सोशल मीडियावर व्हीडीओ, पोस्ट, शिबिरे, पथनाट्यातून राबविण्यात येणार आहे. नागरिकांंनी ओमायक्रॉनबाबत कुठलीही माहिती, पोस्ट शेअर करताना विचार करावा. अफवांविरोधातील या मोहिमेत नागरिकांनी व विशेषत: तरुणांनी जास्त प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन अजित पारसे यांनी केले आहे.