जगदीश जोशी
नागपूर : केवळ दोन दिवसानंतर २५ लाखांच्या मोबदल्यात १.२५ कोटी रुपये परत करणारी टोळी चोरीच्या वाहनांची विक्री, वाळूतस्करीसह अनेक अवैध धंद्यांशी निगडित आहे. माजी मंत्र्यांच्या जवळचे असल्याचे सांगून या टोळीने विदर्भ आणि शेजारील राज्यात अनेक व्यक्तींची फसवणूक केली आहे.
नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीने आकाश उमरे (रा. लांजी, बालाघाट) यांना २५ लाख रुपयांना गंडविले आहे. आकाशला २५ लाखांच्या मोबदल्यात दोन दिवसानंतर १.२५ कोटी परत करण्याची बतावणी आरोपींनी केली. या प्रकरणात अवस्थीनगर मानकापूर येथील रहिवासी पराग दत्तात्रय मोहाडला अटक करण्यात आली आहे. रॅकेटचा सूत्रधार हसनबागमधील कुख्यात आरोपी परवेज पटेल आणि कंचन गोसावीचा शोध सुरु आहे.
सूत्रानुसार पराग आणि परवेज टोळीचे प्रमुख आहेत. कंचन दलालाच्या रुपाने काम करते. पराग याचे महाराष्ट्र आणि शेजारील राज्यातील एका माजी मंत्र्यांशी नाते आहे. तो स्वत:ला दोन्ही मंत्र्यांचा पुतण्या असल्याचे सांगतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर माजी मंत्री आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबत काढलेले भरपूर फोटो अपलोड केलेले आहेत. तो कोट्यवधी रुपयांच्या लक्झरी कारमध्ये फिरतो. नागरिकांवर प्रभाव टाकण्यासाठी कोणतेही काम सहज करून देण्याचा दावा करतो. माझे काका मंत्री आहेत, असे सांगून धमकी देतो.
माजी मंत्र्यांशी असलेल्या कथित नात्यामुळे पराग आणि त्याचे साथीदार आधी वाळूतस्करीतून वसुली करीत होते. त्यानंतर ते स्वत:च तस्करी करू लागले. सूत्रांनुसार पराग आणि त्याचे साथीदार आधी चोरीच्या वाहनांच्या विक्रीतही सक्रिय होते. किस्त (हप्ता) न दिल्यामुळे फायनान्स कंपन्या वाहने सिझ करतात. परागशी निगडित व्यक्ती वाहनांच्या फायनान्सचे काम करतात. त्यांच्या ओळखीचे लोक शेजारील राज्यातून किस्त न भरणाऱ्या वाहनांना कमी किमतीत खरेदी किंवा चोरी करीत होते. या वाहनांना दुसऱ्या राज्यात पाठवून बनावट कागदपत्र आणि नंबरच्या आधारे चालविण्यात येते. यात आरोपींनी चांगलीच कमाई केली आहे. गुंतवणुकीच्या चार-पाच पट अधिक रक्कम देण्याचे आमिष दाखवून शेजारील राज्यातील अनेक नागरिकांना गंडविले आहे.
तक्रारीची धमकी नागरिकांनी दिल्यास ते माजी मंत्री आणि प्रतिष्ठित व्यक्तींची नावे सांगून आयकर विभागाच्या तपासात फसविण्याची धमकी देतात. तरीदेखील समोरची व्यक्ती तक्रार देण्याची भाषा करीत असेल तर मारहाणीची, खुनाची धमकी देतात. पीडित व्यक्ती प्रभावशाली असल्यास त्याला काही रक्कम देऊन शांत करतात. पोलिस ठाण्यात चकरा माराव्या लागतील या भीतीने अनेकजण तडजोड करतात. यामुळे पराग आणि परवेज बिनधास्तपणे आपले रॅकेट चालवित होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा किंवा स्वतंत्र तपास पथकाच्या माध्यमातून करण्याची मागणी होत आहे.
............