रामबागमधील शौचालयाची दुर्दशा : मनपाच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील सार्वजनिक शौचालये स्मार्ट होतील, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा होती. परंतु स्मार्ट शौचालय तर दूरच असलेल्या शौचालयांची दुरुस्ती केली जात नाही. मनपाच्या बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने शौचालयांची दुर्दशा झाली आहे. प्रभाग १७ मधील रामबाग येथील सार्वजनिक महिला शौचालयाची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. शौचालयाला दरवाजे नसल्याने महिलांना दारावर कपडे लावून शौचाला जावे लागते.
बैद्यनाथ चौकातील कामगार भवन मागील वसाहतीत शासनाच्या वतीने सार्वजनिक शौचालय अनेक वर्षांपूर्वी बांधली. त्यातील महिला शौचालयाचे दरवाजे मागील काही महिन्यापूर्वी गायब झाली. त्यामुळे दारावर कपडे लावून शौचास बसावे लागते. त्यात शौचालयाची सीट तुटलेल्या आहेत. बाजूच्या गडरलाईन दुरुस्तीचे काम मागील काही वर्षांत झालेले नाही. त्यामुळे आजूबाजूला घाण साचते. पर्याय नसल्याने महिलांना या शौचालयाचा वापर करावा लागतो.
मनपाच्या बांधकाम विभागाकडे शौचालयाचे बांधकाम व दुरुस्तीची जबाबदारी आहे. मात्र या विभागाकडे अनेकदा तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही. शहरात कोरोना संक्रमण असताना शौचालयाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.
रामबाग येथील बसपा कार्यकर्ते सुरेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी धंतोली झोनच्या सहायक आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात जगदीश गजभिये, आर्यन कांबळे, सूरज पुराणिक, अश्विन सोनटक्के, विनोद इंगळे, शालू तागडे, जया ठाकरे व नागरिकांचा समावेश होता.
..........