लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाकडून नागपूर महापालिकेला कोविशिल्ड लसीचा मागणीनुसार पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे, मनपाच्या लसीकरण केंद्रावर सलग दुसऱ्या दिवशी आज मंगळवारी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
पुरेशा प्रमाणात डोसचा पुरवठा होत नसल्याने मागील काही दिवसात सात दिवस शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. २३ जूनला १८ वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु डोस उपलब्ध नसल्याने २५ जून, २७ जून, २९ व ३० जून व १ व २ आणि ३ जुलैला लसीकरण बंद होते. त्यात सोमवारी सायंकाळपर्यंत महापालिकेला डोस उपलब्ध झाले नाही. यामुळे मंगळवारी शहरातील महापालिकेचे लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.
१८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व महाल येथील मनपाच्या स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र येथे उपलब्ध आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी आवश्यक आहे.