निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन मुलींची आई मीरा वेलणकर आणि तरुण रॉबर्ट किंग्सले यांनी सायकलिंगमध्ये विश्वविक्रम नोंदविण्याकडे झेप घेतली आहे. एकत्रितपणे सायकल चालवत (टॅन्डेम सायकल राईड) मोठे अंतर कापण्याचा हा विक्रम असेल. मीरा व रॉबर्टच्या टीमने कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला आहे. हा प्रवास करताना त्यांची जोडी शनिवारी रात्री २ वाजता नागपूरला पोहचली तेव्हा येथील सायकल राईडर्स ग्रुपने त्यांचे जंगी स्वागत केले.
मीरा व रॉबर्ट यांची टीम १० ऑक्टोबर रोजी कन्याकुमारीहून निघाली. नवव्या दिवशी ते नागपूरला दाखल झाले. यावेळी मीरा यांनी लोकमतशी संवाद साधला. सोलो सायकलमध्ये विक्रम नोंदविले आहेत पण टॅन्डेम राईडमध्ये एवढे मोठे अंतर पार करण्याचा विक्रम नाही. कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर ३५०० किमीपेक्षा अधिक आहे आणि १६ किंवा १७ व्या दिवशी पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. हैदराबादमध्ये पूर परिस्थिती असूनही तेथील सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांनी केलेल्या स्वागताचा त्यांनी उल्लेख केला. रविवारी दुपारी १ वाजता ते शिवनी मार्गे काश्मीरच्या दिशेने रवाना झाले. रविवारी रात्री शिवनीमध्ये मुक्काम करून पुढचा प्रवास करू. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व दिल्ली होत जम्मू व काश्मीरच्या पायथ्याशी प्रवास थांबवू, असे त्यांनी स्पष्ट केले.कोरोनामुळे लोकांच्या मनात भीती आहे. ती आमच्याही मनात आहे व त्याने एक पोकळी निर्माण केली आहे. मात्र ही भीती दूर करीत लोकांना पर्यावरण, सायकलिंग व सकारात्मकतेचा संदेश देण्यासाठी ही टॅन्डेम सायकल राईड सुरू केली आहे.- मीरा वेलणकर, सायकल राईडर- मलेशिया व थायलँडमध्ये टॅन्डेम राईडचा विक्रम. पहिल्या भारतीय.- ३५० किमीचा अरवली पर्वत रांगेचा प्रवास ३ दिवसात करण्याची कामगिरी- टॅन्डेम सायकल व बाईक राईडमध्ये दोनदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद- २०१५ साली ट्रायथलॉनमध्ये लिम्का बुकमध्ये नोंद.- २०१५ साली मलेशियामध्ये हॉफ आयर्नमॅन शर्यतीत यशस्वी फिनिशर.- २०१४ मध्ये पर्वत ट्रायथलॉन व हैदराबाद ट्रायथलॉनमध्येही यशस्वी.