३,५७९ रुग्णांची भर : रुग्ण बरे होण्याचा दर १४ टक्क्याने घसरला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोविड-१९’ विषाणूमध्ये ‘डबल म्युटेशन’ झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विषाणूचा हा नवीन प्रकार किती धोकादायक आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. परंतु म्युटेशनमुळे रुग्ण व मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसात ते दिसूनही येत असल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी ४७ रुग्णांचे जीव गेले. या वर्षातील ही सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. यात ३,५७९ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,०७,०६७ झाली असून, मृतांची संख्या ४,७८४ वर पोहचली आहे.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांसोबतच ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाबाधितांच्या विषाणूची जनुकीय संरचनेचा शोध घेण्यासाठी म्हणजे ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करण्यासाठी दिल्ली व पुण्याच्या प्रयोगशाळेत मेयोच्या प्रयोगशाळेने २०० नमुने पाठविले होते. परंतु याचा अहवाल प्रसिद्ध न करता महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे ‘डबल म्युटेशन’ झाले एवढेच सांगितले जात आहे. यामुळे कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनेला अजूनही फारसे गंभीरतेने घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी १६,०६४ चाचण्या झाल्या. यात १२,५५३ आरटीपीसीआर तर ३,५११ अँटिजेन चाचणीचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ३,४७० तर अँटिजेनमधून १०९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णवाढीचा दर हा १.७२ टक्के असून, मृत्यूचा दर २.३१ टक्के आहे. गुरुवारी चाचण्यांच्या तुलनेत २२.२७ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले.
- शहरात २,५९७, ग्रामीणमध्ये ९७८ रुग्णांची नोंद
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील २,५९७, ग्रामीणमधील ९७८ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ३३, ग्रामीणमधील १० तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातील बाधितांची संख्या १,६४,२४९ झाली असून, मृतांची संख्या ३,०६५ झाली. ग्रामीणमध्येही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत ४१,८०३ रुग्ण व ८८६ रुग्णांचे जीव गेले.
-कोरोनावर मात करणाऱ्यांच्या दरात १४ टक्क्याने घट
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा दर हा ९४ टक्के होता. आता यात १४ टक्क्याने घट होऊन ८०.८७ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी २,२८५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,६७,४६४ झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येने धाकधूकही वाढविली आहे. ३४,८१९ रुग्ण नागपूर जिल्ह्यात अॅक्टिव्ह असून, यातील ८,०५९ रुग्ण विविध रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये आहेत. २६,७६० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
कोरोनाची स्थिती
दैनिक चाचण्या : १६,०६४
एकूण बाधित रुग्ण :२,०७,०६७
सक्रिय रुग्ण : ३४,८१९
बरे झालेले रुग्ण :१,६७,४६४
एकूण मृत्यू : ४,७८४