योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामार्गांवरून प्रवास करत असताना ‘टोल’वर थांबण्याच्या त्रासापासून दिलासा मिळावा यासाठी ‘फास्टटॅग’ची सुरुवात करण्यात आली. परंतु काही ‘टोलप्लाझा’वर चक्क ‘कोरोना’चे नाव पुढे करत वाहनचालकांकडून ‘डबल’ वसुली सुरू आहे. ‘फास्टटॅग’ असतानादेखील मशीन काम करत नसल्याचे कारण देत रोख रक्कम घेतली जात आहे व वाहनचालकांच्या ‘फास्टस्टॅग’मधूनदेखील रक्कम वजा होत आहे. बऱ्याच वाहनचालकांना असा अनुभव आला असून कर्मचाऱ्यांकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात ‘लोकमत’कडे एकाच ‘बूथ’वरील दोन पावतीचे पुरावेदेखील उपलब्ध आहेत.
उपराजधानीतील मूर्तिकार मनोज बिंड कामानिमित्त ७ जुलै रोजी कोंढाळी येथे गेले होते. वाहनावर ‘फास्टटॅग’ असल्याने ते निश्चिंत होते. मात्र अमरावती मार्गावरील गोंडखैरी ‘टोलप्लाझा’वर गाडी थांबविण्यात आली. ‘कोरोना’मुळे ‘फास्टटॅग’ची प्रणाली ‘अपडेट’ झाली नसल्याने बंद असल्याचे कारण देत त्यांच्याकडून रोख रक्कम घेण्यात आली. बिंड रात्री ७.३० ला नागपूरकडे निघाले. परत त्यांना तेच कारण देण्यात आले व त्यांच्याकडून रोख पैसे घेऊन पावती देण्यात आली. मात्र ८ मिनिटांतच त्यांच्या ‘मोबाईल’वर ‘फास्टटॅग’च्या खात्यातून पैसे वजा करण्यात आल्याचा ‘एसएमएस’ आला. याचा अर्थच ‘टोलबूथ’वर ‘फास्टटॅग’ यंत्रणा कार्यान्वित होती. परंतु तरीदेखील कर्मचाऱ्यांकडून दिशाभूल करण्यात आली. केवळ माझ्याकडूनच नव्हे तर अशाप्रकारे अनेकांकडून रोखच रक्कम घेण्यात आली, असा दावा बिंड यांनी केला आहे.पावतीवर वाहनाचा क्रमांकच नाहीनियमांनुसार रोख रक्कम दिली असेल तर पावतीवर वाहनाचा क्रमांक येणे आवश्यक आहे. मात्र बिंड यांच्या दोन्ही पावत्यांवर वाहनाचा क्रमांकच देण्यात आला नाही. आणखी काही वाहनचालकांसोबतदेखील असा प्रकार झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘फास्टटॅग’ प्रणाली तर सुरूचयासंदर्भात ‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक विलास ब्राह्मणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘कोरोना’मुळे कुठलीही यंत्रणा बंद नसून गोंडखैरी टोलबूथवर ‘फास्टटॅग’ प्रणाली सुरू असल्याचे सांगितले. वीज पडल्यामुळे एकाच ‘लेन’ला अडचण होती. मात्र इतर ‘लेन’मध्ये प्रणाली सुरळीत सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. संबंधित टोलबूथ ‘बीओटी’ तत्त्वावर देण्यात आला असून नियमांनुसार पावतीवर वाहनाचा क्रमांक असणे आवश्यकच आहे. अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे ‘फास्टटॅग’मधूनदेखील पैसे वजा होतात. मात्र प्रणाली सुरू असताना असे कसे झाले याची विचारणा करण्यात येईल, हे त्यांनी स्पष्ट केले.