नागपूर : उन्हाळा आणि आंब्याचा रस हे समीकरण आहे. पिकलेले आंब्याने जिभेला पाणी सुटले नाही तर नवलच. मात्र, सध्या आंब्याच्या रसावर ताव मारणाऱ्यांना यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विदर्भात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे.
शेजारच्या राज्यातून मुख्यत्त्वे अनंतपूर जिल्ह्यातून (आंध्रप्रदेश) येणाऱ्या आंब्यांची आवकही कमी आहे. सुरुवातीला डिसेंबर महिन्यात कळमना फ्रूट बाजारात बैंगनपल्लीचे भाव १५० रुपयांवर गेले होते. सध्या दररोज बैंगनपल्ली आंब्याच्या दीड ते २ हजार क्रेट (एक क्रेट २० किलो) विक्रीसाठी येत असून भाव दर्जानुसार प्रतिकिलो ७० ते १०० रुपयांपर्यंत उतरले आहेत. सध्या केवळ बैंगनपल्ली आंब्याची आवक आहे. दरवाढीमुळे बाजारात दाखल झालेला आंबा खाण्यास परवडणारा नाही.
कळमना फ्रूट अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, आंध्रप्रदेशात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाअभावी आंब्याचे उत्पादन २० ते २५ टक्के कमी राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून सुरू झालेली आवक मेपर्यंत राहील. सध्या सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी आंब्याची आवक आहे. सध्या कळमन्यात भाव ७० ते १०० रुपये किलो असून किरकोळमध्ये दुप्पट भावात विक्री होत आहे. बैंगनपल्ली आंबा कळमन्यातून मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात विक्रीसाठी जात आहे.किरकोळमध्ये १५० ते १८० रुपये किलोयंदाच्या मोसमात केवळ आंध्रप्रदेशचा बैंगनपल्ली आंबा कळमन्यात विक्रीसाठी आला आहे. घाऊक बाजारात भाव ७० ते १०० रुपये किलो आहेत. किरकोळमध्ये दुप्पट भावात खरेदी करावा लागत आहे. आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील. दोन वर्षांआधी हंगामाअखेरीस किरकोळमध्ये बैंगनपल्लीचे भाव ४० ते ५० रुपये किलोपर्यंत कमी झाले होते. कोकणचा हापूस आणि विदर्भातील गावरानी आंबा येण्यास उशीर आहे.
वारा, अवकाळी पावसाने नुकसानविदर्भात नागपूर जिल्हा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ बुलढाणा, भंडारा, गोंदिया या भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळाला. काही ठिकाणी तर झाडाला लागलेल्या कैऱ्याही पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे.
भाव कमी कधी होणार?विदर्भात आंध्रप्रदेशच्या बैंगनपल्ली आंब्याची सर्वाधिक आवक होते. पण यंदा उशीर झाला आहे. आंब्याचा हंगाम नोव्हेंबर अखेरपासून मे महिन्यापर्यंत असतो. किरकोळमध्ये भाव १५० ते १८० रुपये किलो आहेत. दोन वर्षांआधी हंगामाअखेर भाव ४० ते ५० रुपयांवर आले होते. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याचे भाव कमी होतील.कोकणातून आंबा येण्यास उशीरआंध्रप्रदेशातून येणारे बैगनफल्ली, तोताफल्ली आणि निलम आंब्यांची आवकही गेल्या काही वर्षांपासून कमी होत आहे. नैसर्गिक संकटांचा आंब्याला फटका बसला आहे. रसाचे आंबेही महागले आहेत. सध्या कळमना बाजारात केवळ बैंगनपल्ली आंब्याची आवक आहे. कोकणातून हापूस आंबा येण्यास एक महिन्याचा कालावधी आहे.
यावर्षी विदर्भासह अनेक राज्यात गारपीटीमुळे आंब्याचा बार झडला आहे. त्यामुळे यंदा २० ते २५ टक्के आवक कमी राहील. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमीच आहे. सध्या आंध्रप्रदेशातून बैंगनपल्ली आंब्याची आवक सुरू आहे. पुढील महिन्यात सर्वच प्रकारचे आंबे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. - आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फ्रूट अडतिया असोसिएशन.