कमलेश वानखेडे
नागपूर : एकच मतदार दोन- दोन ठिकाणी मतदान करण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आता निवडणूक आयोगाने सॉफ्टवेअरचा वापर करून दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी सारखा फोटो असलेले मतदार शोधले आहेत. अशा ‘डबल व्होटर’ची भेट घेऊन बीएलओ (बूथ लेव्हर ऑफिसर) हे गरुडा ॲपच्या माध्यमातून कुठल्याही एका ठिकाणी मतदाराचे नाव ठेवून दुसऱ्या ठिकाणचे नाव ‘डिलीट’ करणार आहेत.
निवडणूक आयोगाने मतदार यादीतील छायाचित्रांच्या समान नोंदी (फोटो सिमिलर एन्ट्रीज) शोधून त्याची बूथनिहाय यादी तयार केली आहे. संबंधित यादी बीएलओ (बूथ लेव्हर ऑफिसर) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गरुडा ॲपवरही याचा डाटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता बीएलओ संबंधित मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन संमती घेतील व कुठल्याही एका ठिकाणी मतदाराचे नाव ठेवून दुसऱ्या ठिकाणचे नाव ‘डिलीट’ करतील.
एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेत करता येईल मतदान
- महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकाचवेळी नसतात. नियमानुसार कोणत्याही मतदाराने एकाच स्थानिक स्वराज संस्थेसाठी मतदान करणे अपेक्षित आहे. एखाद्या मतदाराचे नाव नागपूर शहरातील वॉर्डात तसेच काटोल तालुक्यातील एखाद्या गावातही असेल तर तो महापालिकेच्या निवडणुकीत नागपूर शहरात मतदान करतो व जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावात मतदान करतो. आता मतदार यादीत दोनदा असलेली नावे फोटोवरून ओळखून ती वगळली जाणार असल्यामुळे दोन्ही ठिकाणी मतदान करण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.
अशी होतील नावे ‘डिलीट’
- मतदार जर आपल्याच यादी भागात राहत असेल तर ओरिजिनल पर्यायावर क्लिक करून नाव आहे तेथे कायम ठेवले जाईल.
- जर मतदार स्थलांतरित, अनुपस्थित किंवा मृत्यू झाला असेल तर त्याची खातरजमा करून त्याचे नाव कमी केले जाईल.
- यादीतील मतदाराचा फोटो चुकीचा असेल तर फोटो मॅच होत नसल्याची नोंद केली जाईल.
...तर मतदानापासून वंचित
- मतदार यादीत दोन ठिकाणी फोटो आढळलेल्या मतदारांनी बीएलओला प्रतिसाद देत कुठे नाव ठेवायचे व कुठले कमी करायचे हे स्पष्ट केले नाही तर मात्र बीएलओ स्वत: निर्णय घेतील. यानंतर जेथे नाव कायम असेल तेथेच मतदान करता येईल. त्यामुळे मतदारांनी वेळीच पुढाकार घेत बीएलओंना योग्य माहिती देण्याची गरज आहे.