नागपूर : एकीकडे सण उत्सवाचा उत्साह वाढला असताना, दुसरीकडे कोरोनाचा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी दैनंदिन रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ झाली. १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात ६४ रुग्ण आढळून आले असताना, या आठवड्यात ७४ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली.
नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ७२ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २९ रुग्ण आढळून आले होते, परंतु सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णांमध्ये वाढ झाली. या आठवड्यात ३५ रुग्ण, १ मृत्यू, ५ ते ११ सप्टेंबर या आठवड्यात ६४ रुग्ण तर १२ ते १८ सप्टेंबर या आठवड्यात ७४ रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली आहे. या आठवड्यात सलग चार दिवस दुहेरी आकडा होता. जिल्ह्यात शनिवारी ४,६६४ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत ०.३ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ११, ग्रामीण भागातील ४ तर जिल्ह्याबाहेरील १ रुग्ण आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या तुलनेत कमी, ६ रुग्ण बरे झाले. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ७९ झाली आहे. यातील ४८ रुग्ण शहरातील, २८ रुग्ण ग्रामीण भागातील तर ३ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.
-लक्ष्मीनगरातील एकाच कुटुंबातील ३ रुग्ण बाधित
मागील २४ तासांत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लक्ष्मीनगर झोनमधील ५, धरमपेठ झोनमधील २, हनुमानगर झोनमधील २, नेहरूनगर व गांधीबाग झोनमधील प्रत्येकी १ रुग्ण आहे. विशेष म्हणजे, लक्ष्मीनगरातील एकाच कुटुंबात ३ रुग्ण आढळून आले. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना आमदार निवासात दाखल करण्यात आले आहे. १० दिवसांनी पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करून, निगेटिव्ह आलेल्यांना पुढील ७ दिवसांसाठी होम आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.