लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदाता यादीत अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना निवेदन सोपविण्यात आले. निवेदनात नागपूर लोकसभा क्षेत्रात ३४ हजार नावे आणि रामटेक क्षेत्रात ३१ हजार मतदातांची नावे एकापेक्षा अधिक वेळा नोंदविल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्त्वात शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीने संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मतदान यादीतील त्रुटींबाबत माहिती दिली. विकास ठाकरे म्हणाले की, मतदाता यादीत एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक वेळा नोंदविले जाणे गंभीर बाब आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदाता यादीत राज्यात एकूण ८ कोटी ४४ लाख मतदाता आहेत. यामध्ये ४४ लाख मतदात्यांचे नाव एकापेक्षा अधिक वेळा नोंदविण्यात आले असल्याचा आरोप केला. शहरातील विधानसभेच्या सहा जागांवर अशाप्रकारच्या मतदात्यांची संख्या ३४ हजारांपेक्षा अधिक असल्याचेही ते म्हणाले. याचप्रमाणे मुळक यांनी सांगितले की, काँग्रेसने बुथनिहाय अभ्यास केला असता, रामटेक लोकसभेच्या सहा विधानसभा क्षेत्रात ३१,२४५ लोकांची नावे एकापेक्षा अधिक वेळा नोंदविण्यात आली आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून, या त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी केली. मतदार यादीतील घोळ दूर केला नाही तर याचा मतदान व निकालावरही परिणाम होऊ शकतो, असा धोका काँग्रेसतर्फे वर्तविण्यात आला. श्ष्टिमंडळात माजी आ. एस.क्यू.जामा, अॅड.अभिजीत वंजारी, तक्षशिला वाघधरे, सुरेश भोयर, मुजिब पठाण, कुंदा राऊत, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, संदिप सहारे, रमन ठवकर, राजेश कुंभलकर, अॅड.अक्षय समर्थ, युगल विदावत, प्रविण गवरे, विवेक निकोसे, गौरव चव्हाण, विश्वनाथ देशमुख, अशोक यावले, सुजाता कोंबाडे, नाना कंबाले, अमित पाठक, रिंकु जैन, राजेश पायतोडे, जगदीश गमे, सुभाष मानमोडे, प्रशांत ठाकरे, धरम पाटील, भारती कामडी, सुनिता जिचकार, रजत देशमुख, वसीम शेख,मुजाहीद खान, शांताराम मडावी, ईरशाद अली, देवा उसरे, पवन प्रजापती अदींचा समावेश होता.