लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवेशी मैत्री करत धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या एका कोचमधून धूर निघताना दिसल्याने प्रवासी घाबरतात. शंका-कुशंकाचे पेव फुटते. एक तरुण लगेच लगेच ट्वीट करून रेल्वे मंत्रालयाला माहिती कळवितो. तत्परता अशी की लगेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहचतात आणि दोष दुर (दुरूस्ती) करून गाडीला पुन्हा गती दिली जाते. घटना आज सायंकाळची आहे.
यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनकडे निघालेली १२६४९ संपर्क क्रांती एक्सप्रेस हवेशी मैत्री करत वेगाने नागपूरकडे येत असते. सायंकाळी ४:३५ च्या सुमारास कोच नंबर एस-३ मध्ये बसलेल्या प्रवाशांना धूर निघताना दिसतो. सारेच घाबरतात. बर्निंग ट्रेनची शंका अन् कल्पनेचा बाजार मांडून काही जण प्रवाशांची घबराट अधिकच गडद करतात. मोहम्मद आसिम नामक एक तरुण लगेच ट्विट करून रेल्वे मंत्रालयाला ही माहिती कळवितो. त्याची त्याच तत्परतेने दखल घेतली जाते. आरपीएफची महिला कर्मचारी पूजा कोच अटेंड करते. सायंकाळी ४:४० वाजता गाडी माजरी स्थानकाजवळ थांबवली जाते. हा 'ब्रेक बाइंडिंग'चा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच कॅरेज अॅन्ड वॅगन डिपार्टमेंटचे पथकही पोहचते. १० ते १५ मिनिटात दुरूस्ती केली जाते आणि गाडी पुन्हा आधी पेक्षा जास्त वेगाने नागपूरकडे धावायला सुुरूवात करते.
काय आहे ब्रेक बाइंडिंग ?
ट्रेनमध्ये लोखंडी ब्रेक शू असतो. गती कमी करण्यासाठी लावण्यात आलेला ब्रेक काही वेळा ट्रेनच्या चाकासोबत जुळून राहतो आणि त्याच अवस्थेत ट्रेन धावत असल्याने घर्षण होते. परिणामी धूर निघतो. त्याला ब्रेक बाइंडिंग म्हणतात. दरम्यान, हा धूर पाहून सरळ साधे प्रवासी घाबरतात. वेगवेगळ्या शंका-कुशंकामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण होते. कुणी बर्निंग ट्रेनचीही शंका उठवतो. त्यामुळे प्रवासी जास्तच घाबरतात. मात्र, येथे घाबरण्यासारखे काहीही नसते.
अशी होते दुरूस्तीब्रेक बाइंडिंगला सामान्यांच्या भाषेत 'ब्रेक चक्क्याला चिपकने' म्हणतात. ब्रेक बाइंडिंग झाल्यास गाडी थांबवून ट्रेनचा प्रशिक्षित कर्मचारी, लोको पायलट अथवा गार्ड तेथे पोहचतो आणि वॅक्यूम रिलिज करून हा दोष दूर केला जातो. त्यानंतर ब्रेक आधीसारखा होतो आणि चक्काही फ्री होतो. हा दोष केवळ १० ते १५ मिनिटात ठिक केला जातो. रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मते ही एक सामान्य घडामोड असते, असे या संबंधाने माहिती देताना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य विजय ढवळे यांनी लोकमतला सांगितले.