- कोरोना रिटर्न्स : मनपा आयुक्तांच्या आदेशांत, यादीत उल्लेखच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानंतर शनिवारी व रविवारी देवस्थळे उघडायची की नाही, याबाबत साशंकता आहे. मनपाने जारी केलेल्या यादीत देवस्थळे बंद करण्याबाबत कोणतेही दिशानिर्देश नसल्याने देवस्थानांच्या समिती व विश्वस्त मंडळे संभ्रमात आहेत. शिवाय, कोणत्याच प्रकारचे आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचले नसल्यानेही स्थिती भ्रमात पाडणारी आहे. मात्र, शासन-प्रशासनाच्या नियमांच्या आधारे यावर तात्काळ निर्णयही घेतला जाऊ शकतो, अशी भावनाही व्यक्त केली जात आहे.
श्री गणेश मंदिर टेकडी
देवस्थान बंद ठेवण्याचे आदेश प्राप्त झाले नसल्याचे सीताबर्डी येथील श्री गणेश मंदिर टेकडी ट्रस्टचे सचिव संजय जाेगळेकर यांनी सांगितले. मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी पूर्वीच्या दिशानिर्देशाप्रमाणेच व्यक्तिश: अंतर, मुखाच्छादन आणि निर्जुंतकीकरणाची व्यवस्था आहे. स्वत: मास्क न घालणाऱ्या भक्तांना देवस्थानाकडून मास्क पुरविले जात आहेत. शिवाय सकाळ, दुपार व संध्याकाळी देवस्थानात निर्जंतुकीकरण केले जाते. आदेश प्राप्त होताच, प्रशासनाच्या नियमांचे पालन केले जाईल, असे जोगळेकर म्हणाले.
श्री सिद्धिविनायक मंदिर
महाल येथील श्री सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. श्री सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रसच्नुसार सकाळी ६ वाजता मंदिराचे पाट उघडले जातील. केवळ पुरोहितांच्या हस्ते अभिषेक, शृंगार व पुजन केले जाईल. त्यानंतर मंदिराचे पाट बंद करण्यात येतील.
गीता मंदिर
कॉटन मार्केट रोड येथील श्री गीता मंदिरात शनिवारी माघ पौर्णिमेच्या पर्वावर देवीला अभिषेक घातला जाईल. शृंगार आणि आरती होईल. मंदिराचे संचालक स्वामी निर्मलानंद महाराज यांच्या सानिध्यात धार्मिक कार्यक्रम पार पडतील. मात्र, भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
एसएफएस चर्च
सदर येथील एसएफएस चर्चमध्ये प्रार्थना होईल. मर्यादित संख्येत भक्तांना प्रवेश असेल. शिवाय, मास्क अनिवार्य असेल. फादर एन्थोनी डिसूजा यांनी सर्व प्रोटोकॉल जपले जात असल्याचे व प्रशासनाच्या नियमांचे पालन केले जातील, असे सांगितले.
दीक्षाभूमी
दीक्षाभूमीचे द्वार दर्शनासाठी उघडले जातील. प्रशासनाकडून बंदचे निर्देश प्राप्त झाले नसल्याचे ट्रस्टने सांगितले. मात्र, कोरोना नियमांचे पालन आधिपासूनच केले जात आहे. येथे पाच-पाचच्या संख्येत अनुयायींना प्रवेश दिला जात आहे. मास्क अनिवार्य करण्यात आला असून, निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
भवानी माता मंदिर
पारडी येथील भवानी माता मंदिर भक्तांसाठी उघडे राहील. येथे शनिवारी माघ पौर्णिमेच्या पर्ववार सकाळी ५.३० वाजता अभिषेक, शृंगार व आरती होईल. भक्तांना मर्यादित संख्येत प्रवेश दिला जाईल. निर्जंतुकीकरण, सुरक्षित अंतर व मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.
गुरुद्वारा
शनिवारी व रविववारी गुरुद्वारे नियमित वेळेनुसार उघडले जातील. परंतु, दर्शनाचा वेळ कमी करण्यात आला आहे. मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर सर्वच गुरुद्वाऱ्यांना जपले जात आहे. रामदासपेठ येथील गुरुद्वारा श्री गुरु रामदास साहिबचे ट्रस्टी हरजितसिंह बग्गा यांनी सांगितल्यानुसार सकाळी व संध्याकाळी ७ ते ८ याच वेळेत कीर्तन होईल. प्रशासनाच्या नियमांचे पालन केले जाईल. रविवारी एक तासासाठीच गुरुद्वारा उघडला जाईल.
मशिदींमध्ये नियमांचे पालन
शहरातील मशिदी नियमांसह उघडले जातील. प्रशासनाकडून मशीद बंद ठेवण्याचे आदेश प्राप्त झाले नसल्याचे मोमीनुपरा येथील जामा मशिदचे सचिव मोहम्मद साजिद यांनी सांगितले. परंतु, मार्गदर्शिकेनुसार सॅनिटायझर, मास्क व सुरक्षित अंतर बाबत विशेष काळजी घेतली जात आहे. कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रभावानुसार सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे मशिद गरीब नवाजचे मुतवल्ली हनिफ पटेल यांनी सांगितले. प्रशासनाकडून धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश मिळाले तर तात्काळ अंमलबजावणी केली जाईल.
.....