लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संशयाचे भूत मानगुटीवर बसल्यामुळे एक हसता खेळता परिवार झटक्यात उध्वस्त झाला. शिघ्रकोपी पत्नीने आपल्या पोटच्या गोळळ्याला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकाराला मृत महिलेचा नवराच कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी लावल्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली. चटका लावून जाणारी ही हृदयद्रावक घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी २ ते ३ च्या सुमारास घडली. या प्रकरणी सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले. जरीपटक्यात मिसाळ लेआऊट आहे. येथील विनोद शेंडे यांच्या घरी संदीप उर्फ लकी लखनलाल शर्मा (वय ३४) आणि लक्ष्मी संदीप शर्मा (वय ३४) हे दाम्पत्य आपल्या दोन लहानग्या मुलांसह किरायाने राहत होते. त्यांच्या लग्नाला सात वर्षे झाली. दोन गोंडस चिमुकल्यांमुळे हे कुटुंबं तसे वरकरणी आनंदी दिसत होते. मात्र, दोघेही संशयी आणि शिघ्रकोपी स्वभावाचे. त्यामुळे छोट्या छोट्या कारणावरून त्यांच्यात वाद व्हायचा. संदीप हा लेबर कॉन्ट्रक्टर आहे. सकाळी घरून बाहेर पडताना तो पत्नीला वेगवेगळ्या सूचना करतानाच टोमणे मारून जायचा. तर, रात्री दारूच्या नशेत परत आल्यानंतर पत्नी त्याला धारेवर धरायची. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. सोमवारी सकाळी असेच झाले. त्यानंतर संदीप कामावर निघून गेला. दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान संदीपचे पुतणे त्याच्या घरी आले. यावेळी त्यांना लक्ष्मी शर्मा (काकू) गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. घरातील पाण्याच्या टाकीत चिमुकला सार्थक (वय ९ महिने) डोके खाली अन् पाय वर अशा अवस्थेत मृत पडून होता. पुतण्यांनी आरडाओरड करून शेजा-यांना गोळा केले. डॉक्टरला बोलविण्यात आले. मात्र, तोवर सारेच संपले होते. या घटनेची माहिती कर्णोपकर्णी परिसरात माहित होताच एकच थरार निर्माण झाला. बघ्यांची मोठी गर्दी शर्माच्या घरासमोर जमली. माहिती कळताच जरीपटका पोलिसांचा ताफाही पोहचला. पोलिसांनी चिमुकला सार्थक अन् लक्ष्मी शर्मा या दोघांचे मृतदेह मेयोत पाठविले. संदीपने दिलेल्या तक्रारीवरून लक्ष्मी शर्मा हिच्याविरुद्ध सार्थकची हत्या करून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सासूची संदीपविरुद्ध तक्रार या हृदयद्रावक घटनेला लक्ष्मीचा पती संदीप लखनलाल शर्मा हाच कारणीभूत असल्याची तक्रार लक्ष्मीची आई कमला ज्ञानीप्रसाद शर्मा (वय ६५, रा. कुशीनगर) यांनी नोंदविली. तो आपल्या मुलीला नेहमी शारिरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्रासाला कंटाळून लक्ष्मी शर्मा हिने हा टोकाचे पाऊल उचलल्याचे कमला शर्मा यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले. त्यामुळे जरीपटक्याचे पोलीस उपनिरीक्षक डोंगरे यांनी संदीपविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. चिमुकला प्रिन्स बनला निराधारलक्ष्मी शर्माने चिमुकल्या सार्थकला ठार मारून आत्महत्या केली. त्यावेळी तिचा दुसरा मुलगा प्रिन्स (वय ४ वर्षे) हा आपल्या आजीकडे होता. त्यामुळे तो बचावला. या निरागस जीवाला काय झाले, ते कळण्याईतपत समज नाही. त्याचा लहानगा भाऊ आणि आई त्याला कायमची सोडून गेली आहे. तर वडील पोलीस कोठडीत पोहचले आहे. काहीच दोष नसताना चिमुकला प्रिन्स निराधार बनला आहे. त्याच्या वृद्ध आजी आजोबांकडे तो सध्या आहे.
संशयाच्या भूताने केले कुटुंबं उध्वस्त
By admin | Published: June 06, 2017 4:12 PM