नागपूर : अपसंपदा प्रकरणात आरोपी असलेला सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाजने प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या दोन वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या सत्यतेवर राज्य सरकारने सोमवारी संशय व्यक्त केला.
बजाजला हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीदोष इत्यादी विविध प्रकारचे आजार जडले आहेत. त्याने मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयाद्वारे १४ ऑक्टोबर व २७ नोव्हेंबर २०२० रोजी जारी वैद्यकीय प्रमाणपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. ती प्रमाणपत्रे संशयास्पद असून त्यांची सत्यता तपासण्याची गरज असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. याशिवाय, बजाजने १६ डिसेंबर २०२० व २२ जानेवारी २०२१ रोजी जारी वैद्यकीय प्रमाणपत्रेही सादर केली आहेत. सरकारने त्यांचीदेखील सत्यता तपासली नाही. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता बजाजच्या जामीनअर्जावर ३० जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. तसेच, राज्य सरकारला आवश्यक वाटल्यास ते यादरम्यान विवादित वैद्यकीय प्रमाणपत्रांची सत्यता पडताळू शकतात, असे नमूद केले. अर्जावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. बजाजतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी तर, सरकारतर्फे अॅड. नितीन रोडे यांनी कामकाज पाहिले.
-----------------
असे आहे प्रकरण
बजाज विद्यार्थ्यांकडून विविध अनावश्यक शुल्क वसूल करीत होता. शिक्षक व कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याकरिता मोठमोठ्या देणग्या घेत होता. तसेच, शासनाकडूनही मदतीच्या स्वरूपात विविध अनुदाने स्वीकारत होता. अशाप्रकारे त्याने कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केली, असा आरोप आहे. या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी २६ सप्टेंबर २०१५ रोजी एफआयआर नोंदवला आहे. बजाज तेव्हापासून जामीन मिळविण्यासाठी धडपड करीत आहे.