नागपूर : उतारवयामध्ये चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला निर्दयीपणे ठार मारणाऱ्या पतीची जन्मठेप व इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यामधील दुर्गापूर येथील आहे.
शंकर जयराम दोडके (६२) असे आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने पेंटर आहे. मृताचे नाव सुगंधाबाई होते. १८ फेब्रुवारी २०२० रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेप व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन वर्षे कारावास, अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने वैद्यकीय पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब व अन्य विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
अशी घडली घटना
सुगंधाबाईचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत, असा आरोपीला संशय होता. त्यावरून तो तिला सतत छळत होता. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, आरोपीने कुदळीचे तब्बल ११ वार करून सुगंधाबाईचे शरीर छिन्नविछिन्न केले. शेजारच्या अनेक नागरिकांनी आरोपीला हल्ला करताना पाहिले हा
खुनाचा हेतू होता
आरोपीचा सुगंधाबाईला ठार मारण्याचा हेतू होता, हे पुराव्यांवरून न्यायालयाला आढळून आले. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरविण्यास नकार दिला. घटनेच्या काही महिन्यांपूर्वी आरोपीने अंगणात खड्डा खोदला होता. तो सुगंधाबाईचा मृतदेह त्यात पुरणार होता. एक दिवस त्याने सुगंधाबाईचे तोंड उशीने दाबून ठेवले होते. त्यावेळी सुगंधाबाई थोडक्यात बचावली होती.