नागपूर : रायपूर, छत्तीसगड क्षेत्रात सुरू असलेल्या रेल्वेच्या विकास कामांमुळे डझनभर रेल्वेगाड्या नागपुरात विलंबाने पोहचल्या. शनिवारी दिवसभर रेल्वेची ही लेटलतिफी सुरू होती. त्यामुळे संबंधित गाडीच्या प्रतिक्षेत प्रवाशांचे मोठे हाल झाले.
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील रायपूर आणि आजुबाजुच्या रेल्वे मार्गावर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे या मार्गाने नागपूरकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्या तिकडे रेंगाळत आहेत. परिणामी नागपूरला आणि नागपूरच्या पुढे पोहचण्यास त्यांना विलंब होत आहे. आज शनिवारी ६ मे रोजी डझनभर रेल्वेगाड्या नागपूर स्थानकावर विलंबाने पोहचल्या. त्यामुळे संबंधित गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या शेकडो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. कोणती गाडी ६ तर कोणती ५ तास विलंबाने पोहचली. हावडा -सीएसटी मेल तर तब्बल ९ तास विलंबाने पोहचली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे खास करून मुले आणि ज्येष्ठांचे मोठे हाल झाले.
हावडा-मुंबई मेल ४ तास विलंब, हावडा-लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी एक्सप्रेस तास, हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस ३:५० तास, गीतांजली एक्सप्रेस ३ तास, शालीमार-पोरबंदर एक्सप्रेस ५: ३० तास, हावडा -पुणे आजाद हिंद एक्सप्रेस ४ तास, सीएसटी- हावडा गीतांजली एक्सप्रेस २ तास, अहमदाबाद- हावडा एक्सप्रेस ३ तास, पुरी साईनगर ४ तास, शालीमार-लोकमान्य टिळक समरसता एक्सप्रेस, गांधी-धामपुरी एक्सप्रेस २ तास, रायपुर-सिकंदराबाद एक्सप्रेस १ तास, हावडा -सीएसटी मेल ९ तास, कोरबा-अमृतसर एक्सप्रेस तास, हावडा -अहमदाबाद एक्सप्रेस ६ तास, हावडा -पुणे दुरंतो एक्सप्रेस ४ तास, विशाखापट्टनम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस २ तास, तिरूपती दानापूर एक्सप्रेस २ तास, हटिया लोकमान्य टिळक एक्सप्रेस ४ तास, अमृतसर बिलासपूर छत्तीसगड एक्सप्रेस ३ तास विलंबाने आज नागपूर स्थानकावर पोहचली.
हावडा लाईनच्या गाड्यांना जास्त विलंब
नागपूर मार्गे विविध ठिकाणी धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांना विलंब होत असला तरी त्यात हावडा लाईनच्या गाड्यांची संख्या जास्त आहे. रेल्वे सूत्रांच्या मते १० मे पर्यंत विकास कामे सुरू असल्याने तोपर्यंत प्रवाशांना असाच त्रास सहन करावा लागू शकतो.