आनंद शर्मा
नागपूर : नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडोर प्रकल्प साकार होण्याच्या दिशेने वेगाने पाऊले पडताना दिसत आहे. त्याअनुषंगाने एरिअलसह सर्व प्रकारचे आवश्यक सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. आता या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या आकडेवारीचे विश्लेषण करून विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम पार पाडून मार्चपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडे हा डीपीआर सोपवला जाण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाकडूनही मंजुरी घ्यावी लागणार आहे. मंजुरी प्राप्त होताच अहमदाबाद-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडोरच्या धर्तीवर नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉर प्रकल्पाचे जमिनीवरील काम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉर प्रकल्प हा २०१९ मध्ये प्रस्तावित सहा नव्या बुलेट कॉरिडोरपैकी एक आहे. या प्रकल्पासाठी नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेडकडून डीपीआर बनविण्याच्या दृष्टीने रेल लाईनची अंतिम अलॉटमेंट डिझाईन व प्रायमरी रुट मॅप बनविण्यासाठी आकाशी सर्वेक्षण (लिडार/एरिअल सर्व्हे) करण्यात आले. यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये निविदा जारी करण्यात येऊन सिकॉन व हेलिका ज्वाॅईंट व्हेंचर कंपनीला एरिअल सर्व्हेचे काम देण्यात आले. १२ मार्च २०२१ला सुरू झालेले हे काम जुलै २०२१ मध्ये पूर्ण झाले. यात हेलिकॉप्टरवर अत्याधुनिक लिड व इमेजनरी सेंसर लावण्यात येऊन मुुंबई ते नागपूर पर्यंत प्रस्तावित रेल्वे मार्गावर सर्वेक्षण करण्यात आले. हवाई सर्वेक्षणानंतर रायडरशिप सर्व्हे, एन्व्हार्नमेंटल इम्पॅक्ट व सोशल इम्पॅक्ट सर्व्हे करण्यात आले. या सर्व सर्वेक्षणातून प्राप्त आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर डीपीआर तयार करण्यात येईल. हे काम लवकरच पूर्ण होऊन डीपीआर मार्चपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडे सोपविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
३५० किमी प्रति तास वेगाने धावणार बुलेट ट्रेन
नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प ७४१ किलोमीटर क्षेत्रावर प्रस्तावित आहे. या क्षेत्रात नागपूर, खापरी डेपो, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव, जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, ईगतपुरी व शाहपूर ही प्रस्तावित थांबे असणार आहेत. या कॉरिडॉरमध्ये ३५० किमी प्रति तास वेगाने बुलेट ट्रेन धावेल. ट्रेनमध्ये एकावेळी ७५० प्रवासी बसू शकणार आहेत.
नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी सर्व प्रकारच्या सर्वेक्षणाचे काम आटोपले आहे. आता या सर्वेक्षणातून प्राप्त अहवालाचे विश्लेषण केले जाऊन डीपीआर तयार केले जात आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन मार्चपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडे डीपीआर सोपवला जाण्याची शक्यता आहे.
- सुषमा गौर, जनसंपर्क अधिकारी, नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लि. दिल्ली.
............