आशिष रॉय
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूर- गोवा ‘एक्स्प्रेस’ वे ची घोषणा केली होती. त्यानंतर लगेच या ‘एक्स्प्रेस वे’च्या कामाला सुरुवात झाली आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) नागपूर-गोवा महामार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करणार आहे. त्यासाठीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. येत्या १८ महिन्यात हा डीपीआर तयार होणार आहे.
एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग नावाने हा ‘एक्स्प्रेस वे’ वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणार आहे. महामार्गाचा शेवट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे महाराष्ट्र-गोवा बॉर्डरवर आहे. यातील अंतर हे ७६० किलोमीटरचे आहे. नागपूर-गोवा जाण्यासाठी २२ तास लागायचे. या महामार्गामुळे आता केवळ ११ तासांत पोहाेचता येईल. हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.
एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड म्हणाले की, शक्तीपीठ ‘एक्स्प्रेस वे’ हा समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार असल्याने नागपूरकर त्यावरून प्रवास करू शकतील. हा एक्स्प्रेस वे समृद्धी महामार्गासारखा सहा लेनचा राहणार आहे. ७० हजार कोटी या प्रकल्पावर अंदाजे खर्च होणार आहे. या प्रकल्पासाठी नोव्हेंबरपर्यंत सल्लागाराची नियुक्ती होऊन जाईल. १२ ते १८ महिन्यात डीपीआर तयार होईल. डीपीआर तयार झाल्यानंतर भूसंपादन आणि आर्थिक बाबी निश्चित करण्यात येईल. त्यानंतर बांधकामाला सुरुवात होईल. १७ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान निविदा सादर करता येतील.
हे जिल्हे जोडले जातील -
वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
ही पर्यटन स्थळे जोडली जातील -
सेवाग्राम आश्रम, कारंजा लाड दत्तमंदिर, माहूरगड, औंधचे नागनाथ मंदिर, नांदेड जिल्ह्यातील गुरुद्वारा, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, लातूरचे सिद्धेश्वर मंदिर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, नरसोबाची वाडी, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी.
- दृष्टिक्षेपात
नागपूर- गोवा अंतर - ७६० किलोमीटर
अंदाजे खर्च - ७० हजार कोटी
सध्या नागपूर ते गोवा पोहाेचण्याची वेळ - २२ तास
एक्स्प्रेस वे बनल्यानंतर पोहाेचण्याची वेळ - ११ तास
जोडण्यात येणारे जिल्हे - १२