-नागपूर : देशातील नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना नागार्जुन, तर एस. नांबिनारायणन यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हिंदू रिसर्च फाउंडेशन आणि मैत्री परिवारच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची घोषणा हिंदू रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. टी. एस. भाल यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.
पुरस्कार प्रदान सोहळा ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयटी पार्क, पर्सिस्टंट सिस्टीमच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या वेळी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मधुसूदन पेन्ना व वर्ल्ड हिंदू काँग्रेसचे संस्थापक स्वामी विद्यानंद प्रामुख्याने उपस्थित राहतील.
भारतात अनेक थोर विचारवंत व शास्त्रज्ञ असलेले ऋषीमुनी होऊन गेले. त्यांच्या कार्याची जगाला पुन्हा एकदा नव्याने ओळख व्हावी, या उद्देशाने त्यांच्या नावाने विविध क्षेत्रांतील नामवंत शास्त्रज्ञांना पुरस्कृत करण्याचा निर्णय हिंदू रिसर्च फाउंडेशनने घेतला आहे. संस्थेचे हे पहिले वर्ष आहे. पुढच्या वर्षीपासून आचार्य कपिल, भास्कराचार्य, आचार्य चराक, आचार्य सुश्रुत, आर्यभट्ट, आचार्य पतंजली, विश्वकर्मा, आचार्य चाणक्य, महर्षी व्यास, महर्षी वाल्मीक, कवी कुलगुरू कालिदास आदी ऋषीमुनींच्या नावानेसुद्धा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला मैत्री परिवाराचे सचिव प्रमोद पेंडके, उपाध्यक्ष प्रा. विजय शहाकार, हर्षवर्धन देशमुख व अभिषेक चच्चा उपस्थित होते.