नागपूर : अनेक वर्षांपासून विकास व पर्यटकांपासून दुर्लक्षित असे अंबाझरी उद्यान आता कात टाकण्यास सज्ज झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने (एमटीडीसी) अंबाझरी जैवविविधता उद्यान पुढील ३० वर्षांसाठी गरूडा ॲम्युझमेंट प्रा. लि., मुंबईला दिले असून, पुढील दोन वर्षांत हे उद्यान जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यास सज्ज होत आहे. येथे जागतिक स्तरावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय म्युझियम साकारले जाणार असल्याचे संबंधित कंपनीने स्पष्ट केले आहे.
अंबाझरी उद्यानात ४ हजार चौरस फूट जागेवर असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तोडण्यात आले. यावरून वाद निर्माण झाला आहे. आंबेडकरवादी संघटनांनी याविरोधात आंदोलन सुरू केले असून, येथे बांधकामच होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गरूडा अम्युझमेंट प्रा. लि.ने आपली बाजू मांडत अंबाझरी उद्यानात तब्बल १० हजार चौरस फूट जागेवर प्रशस्त असे जागतिक स्तरावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय म्युझियम साकारले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या म्युझियममध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याचा पट मांडण्यात येईल. देशभरातील आंबेडकरी समुदायाला हे स्थळ आपलेसे वाटेल. गेल्या १५ ते २० वर्षांपासून येथील आंबेडकर सांस्कृतिक भवनाकडे दुर्लक्ष झाले. या परिसरात अराजक तत्त्वांचा शिरकाव झाला होता. आता मात्र, या स्थळाचे पावित्र्य जपले जाणार असून, समाजातील सर्व घटकांना हे स्थळ आराध्य असे ठरेल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
असे असेल पार्क
- उद्यानात नागपूर सुधार प्रन्यासतर्फे (एनआयटी) दररोज होणाऱ्या साऊंड ॲण्ड लेझर शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा प्रवास पर्यटकांना बघता येणार. इतिहासाची उजळणी होणार.
- उद्यान थीम पार्कमध्ये परावर्तित होणार. दिल्ली हाटच्या धर्तीवर नागपूर हाटची उभारणी.
- १२०० आसन संख्या असणाऱ्या ॲम्पी थिएटरची उभारणी. वेगवेगळ्या राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण.
- उद्यानात रोप-वे, ॲम्युझमेंट साईट्स, बोटिंग रेस्टॉरंट आणि मलेशिया - सिंगापूरच्या धर्तीवर सुसज्ज मत्स्यालय उभारणार.