नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेचा प्रथम पुरस्कार नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाने पटकावला. महात्मा गांधी विचारधारा विभाग येथे अंतिम फेरीनंतर पुरस्कार वितरण करण्यात आले.
'महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामोद्वाराची कल्पना व आजचा युवक' विषयावर पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार गोंदिया येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाने, तृतीय क्रमांकाचा पुरस्कार वर्धा येथील कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्कने पटकावला. तर भंडारा येथील जे. एम. पटेल कॉलेज व वाडी येथील जवाहरलाल कला वाणिज्य महाविद्यालयाने प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त केला.
विद्यापीठाचा महात्मा गांधी विचारधारा विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरनगर येथील महात्मा गांधी विचारधारा विभाग येथे आयोजित पथनाट्य स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी येथील केंद्रीय प्रचार सेवाधिकारी हभप प्रकाश महाराज वाघ, नागपूर जिल्हा सर्वोदय मंडळाचे सचिव रवी गुडधे, महात्मा गांधी विचारधारा विभाग प्रमुख प्रा. प्रमोद वाटकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे उपस्थित होते. संचलन प्रा. देवमन कामडी यांनी केले तर आभार प्रा. डी.एस. वैद्य यांनी मानले.