आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आता देशापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते जगभरात पोहोचले असून त्यांच्याबाबत विदेशी लोकांमध्ये आकर्षण वाढत आहे. त्यामुळेच जगभरात बाबासाहेबांचे पुतळे उभे राहत आहेत. परंतु आता थेट महामानवाच्या पवित्र अस्थीचेच दर्शन विदेशी नागरिकांना होणार आहे. थायलंडने यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे, हे विशेष.थायलंड हे बौद्ध राष्ट्र आहे. तथागत गौतम बुद्ध हे भारताचे असल्याने भारताबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे, आदर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य एकूणच शोषित, वंचित व देशासाठीचे कार्य आणि भारतातून नामशेष झालेला बौद्ध धम्म त्यांनी पुनर्जीवित केल्याने एकूणच बौद्ध राष्ट्रांमध्ये बाबासाहेबांबद्दलही विशेष आदर आहे. यामुळेच मागील कही वर्षात बौद्ध राष्ट्रांमधील प्रतिनिधींच्या नागपूर व दीक्षाभूमीवरील भेटी वाढलेल्या दिसून येतात.थायलंडमध्ये चैतिया पूजेला अतिशय महत्त्व आहे. यानिमित्त थायलंडमधील सर्वात मोठे विद्यापीठ असलेल्या महाचुला विद्यापीठ परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.महाचुला विद्यापीठासह, थायलंडची वायुसेना, महाबोधी सोसायटी श्रीलंका, संबोधी महाविहार श्रीलंका आणि नागपुरातील अहिल्याबाई होळकर संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच भारतातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी जाणार आहे. या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित राहतात. त्यांना महामानवाच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेता येईल, अभिवादन करता येईल.
गगन मलिक यांची मध्यस्थीश्रीलंका येथील सिरी सिद्धार्थ या चित्रपटात तथागत गौतम बुद्धाची मुख्य भूमिका बजावणारे भारतातील कलावंत गगन मलिक यांना बौद्ध राष्ट्रांमध्ये विशेष मान आहे. मागील काही वर्षात भारतातील बौद्ध संघटना आणि बौद्ध राष्ट्रांमध्ये दुवा होण्याचे कार्य ते करीत आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश थायलंडला पाठवण्यात येणार आहे. भारतीय बौद्ध महासेभेचे ट्रस्टी पी.जी. ज्योतीकर यांच्याकडे असलेल्या अस्थी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी एक आकर्षक कलश तयार करण्यात आला आहे.