लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे केवळ विशिष्ट जाती किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. समता व बंधूत्वाच्या विचाराने मानवीयतेच्या दृष्टिकोनातून एकूणच आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे या महामानवाला मानवंदना देण्यासाठी सर्व जाती व धर्माच्या लोकांकडून एकत्रितपणे त्यांची जयंती साजरी करण्याची रुजवात नागपुरात झाली आहे. सामाजिक ऐक्याच्या दर्शनाचे हे तिसरे वर्ष असून, यावेळी त्याला भव्य स्वरूप देण्याचे प्रयत्न संयुक्त नागरी जयंती समितीने केले आहेत.येत्या १४ व १५ एप्रिल रोजी दीक्षाभूमीच्या सभागृहात एकत्रितपणे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. भदंत विमलकित्ती गुणसिरी, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी संयुक्त जयंतीच्या आयोजनाबाबत मंगळवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. जयंती कार्यक्रमांतर्गत १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता प्रबोधनाचा मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी बडोदा येथील महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या नातसून व सयाजीराव विद्यापीठाच्या कुलगुरू राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड प्रामुख्याने उपस्थित राहतील. याशिवाय प्रसिद्ध लेखक व पत्रकार उर्मिलेश, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता गंगाधर बनबरे, रविंदरसिंह गोत्रा, जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष डॉ. अनवर सिद्दीकी, विलास शेंडे आदी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. १५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता ‘भारतीय युवकांचे भवितव्य’ या विषयावर तर सायंकाळी ५.३० वाजता दीक्षाभूमीच्या मैदानावर ‘नवराष्टÑ निर्माणाकरिता महिलांची भूमिका’ या विषयावर प्रबोधान व्याख्यान होईल. यामध्ये डॉ. इंदू चौधरी, जीजा राठोड व रजिया पटेल यांचा प्रमुख सहभाग असेल.या संपूर्ण आयोजनात विविध जाती,धर्माच्या २० पेक्षा जास्त संघटनांचा सहभाग असल्याचे डॉ. तायवाडे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप खोडके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर येवले, जमात-ए-इस्लामी हिंदचे वर्ध्याचे अध्यक्ष सय्यद नियाद अली तसेच आयोजन समितीचे सचिव डॉ. कृष्णा कांबळे, ठेंगरे, जया देशमुख आदी उपस्थित होते.