लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) उपअधिष्ठातापदी नेत्रशल्य चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी डॉ. मदान यांची उपअधिष्ठातापदी (पदव्युत्तर) १७ जानेवारी रोजी नियुक्ती केली. डॉ. मदान यांना स्वत:ची कामे सांभाळून उपअधिष्ठातापदाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. डॉ. मदान हे २००९ पासून नेत्र विभागाचे प्रमुख म्हणून कर्तव्यदक्षपणे जबाबदारी पार पाडत आहेत. डॉ. मदान यांनी आपल्या कार्यकाळात नेत्र विभागात आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांच्या परिश्रमामुळेच रोज नेत्र बाह्य विभागात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णसंख्येत १५० वरून ४०० पर्यंत वाढ तसेच रोज होणाऱ्या नेत्रशल्य चिकित्सकेत १० वरून ५० पर्यंत वाढ झाली आहे. ही संख्या ‘एनपीसीबी’ने नेमून दिलेल्या संख्येपेक्षा खूप जास्त आहे. डॉ. मदान उत्कृष्ट सर्जन असून, त्यांना मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांबाबत खूप कळवळा आहे. त्यांनी नेत्रसमस्या व नेत्रदानाविषयी लोकांमध्ये जागृती घडवून आणली आहे. प्रशासनाने दिलेली जबाबदारी कर्तव्यनिष्ठेने पार पाडू, अशी प्रतिक्रिया डॉ. मदान यांनी दिली. बधिरीकरण विभागाचे प्राध्यापक डॉ. अखिलेश संगावार हे महिनाभरापूर्वी उपअधिष्ठाता पदावरून सेवानिवृत्त झाले, यामुळे प्रशासनाने त्यांच्या जागी डॉ. मदान यांची नियुक्ती केली.