आनंद डेकाटे
नागपूर : देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाइपरायटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, त्या टाइपरायटरसह महामानव डॉ. आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातील अनेक ऐतिहासिक वस्तूंना पुन्हा एकदा वाळवी लागण्याचा धोका निर्माण आहे. तसे पाहता या वस्तू आणखी १०० वर्षे टिकून राहाव्यात, यासाठी या ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली आहे. मात्र तीन वर्षे लोटूनही या वस्तू कुलूपबंदच आहेत. त्या संग्रहालयात योग्य पद्धतीने ठेवल्या गेल्या नाहीत, तर त्यांना पुन्हा वाळवी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी कळमेश्वर रोडवर चिचोली या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील बौद्ध प्रशिक्षण केंद्र साकारण्याचा निर्णय घेतला. १९५७ मध्ये गोपिकाबाई बाजीराव ठाकरे या महिलेने त्यांना येथे ११ एकर जागा दान दिली. या जागेवर गोडबोले यांनी ‘शांतिवन’ उभारले. या परिसरातच त्यांनी एक छोटेखानी संग्रहालय उभारले. त्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण समारंभांत वापरलेले कपडे, कोट, घरगुती कपडे, हॅट, छत्री, पेन, कंदील आदींसह दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंसह देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाइपरायटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, तो टाइपरायटर आदी अनेक ऐतिहासिक वस्तू आणि दस्तऐवज शांतिवन चिचोली येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत.
मागील काही वर्षांपासून देशाचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कपड्यांना वाळवी लागणे सुरू झाले होते. तेव्हा शांतिवन चिचोली येथील भारतीय बौद्ध परिषदेने या वस्तूंचे जतन करण्यासाठी शासनाकडे मागणी केली. शासनाने ही मागणी मान्य करीत या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्यांचे जतन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टीज, लखनऊ’ या केंद्र सरकारच्या संस्थेतर्फे या ऐतिहासिक वस्तूंवर नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयातील प्रयोगशाळेत रासायनिक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रक्रियेनंतर या वस्तू तब्बल १०० वर्षे टिकून राहणार होत्या. याला आता तीन वर्षे झाली आहेत; परंतु शांतिवन चिचोलीतील मुख्य संग्रहालयाची इमारत अजूनही अपूर्णच आहे. त्यामुळे या वस्तू संग्रहालयात न ठेवता कुलूपबंदच आहेत. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया झाली असली तरी मोकळ्या हवामानात या वस्तू असल्याने त्या नष्ट होण्याची भीती आहे.
संग्रहालयाची भव्य इमारत उभी
शांतिवन चिचोलीसाठी सरकारने ४० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. परंतु, अंतर्गत कामे रखडली आहेत. महामानवाच्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्या वस्तू कुलूपबंदच आहेत. या वस्तू लवकर संग्रहालयात स्थानांतरित झाल्या नाहीत तर त्या नष्ट होण्याचा धोका नाकारता येत नाही.
- संजय पाटील, कार्यवाह, भारतीय बौद्ध परिषद