‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 04:58 PM2021-12-16T16:58:22+5:302021-12-17T10:41:47+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्याला प्रचंड मागणी होती. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

dr. Babasaheb Ambedkar's book 'Problem of Rupee' is finally available to the public in marathi | ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन

‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन

googlenewsNext
ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रकाशित होण्याचा दिवस अखेर उजाडला. गुरुवारी १६ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ऐतिहासिक ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन आणि भाषणे या मराठी अनुवादित खंडाच्या माध्यमातून त्यांचे विचार ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी भाषेतील २२ खंडांचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचे काम समितीने युद्धपातळीवर करावे. या कामासाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. डॉ. आंबेडकरांचे चरित्र, त्यांचे विचार, लेखन मराठीतून तसेच डिजिटल माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘प्रकाशन समिती’ने पार पाडावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुरुवारी मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या इंग्रजी खंड ६ च्या मराठी अनुवादाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, समितीचे सदस्य तथा नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, सदस्य डॉ. प्रज्ञा पवार, सहसंचालक डॉ. सोनाली रोडे, सदस्य धनराज कोहचाडे, दूरदृश्यप्रणालीद्वारे एन. जी. कांबळे, एम. एल. कासारे, गिरीराज बागुल आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करताना माझ्यावरची जबाबदारी वाढत असून, वंचित, उपेक्षितांच्या हिताचाच निर्णय घेण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- नागपूरच्या शासकीय ग्रंथालयात खंड उपलब्ध

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पीएच.डी. आणि डीएससीचे शोधप्रबंध या खंडात आहेत. नागपूरच्या शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक केतन लाड यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार हा खंड आणि जनता सोअर्स मटेरियल खंड ३-१ हे देखील शासकीय मुद्रणालय आणि ग्रंथागारात उपलब्ध आहेत. तरी अभ्यासक आणि वाचकांनी हा खंड विकत घ्यावा, अशी माहिती डॉ. आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी दिली आहे.

Web Title: dr. Babasaheb Ambedkar's book 'Problem of Rupee' is finally available to the public in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.