नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली. कुणी केक कापला, तर कुणी बुद्ध -भीमगीते आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विविध बौद्ध विहारांनी रॅली काढून महामानवास मानवंदना दिली. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, संविधान चौक आणि शांतिवन चिचोली येथे मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला होता.दीक्षाभूमीवर दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने सकाळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. कामठी येथील सुप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेसही आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला होता. सकाळी भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यमंत्री राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य अॅड. सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या. शांतिवन चिचोली येथेही लोकांनी एकत्र येऊन अभिवादन केले.>चैत्यभूमीवर मध्यरात्रीपासूनच गर्दीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त दादर चैत्यभूमी येथे रविवारी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. रात्री बारा वाजताच अनेक अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. १४ तारखेला रात्री उशिरापर्यंत अनुयायी चैत्यभूमीकडे येतच होते. शुभ्र कपडे, निळे उपरणे, फेटे घातलेल्या अुनयायांनी चैत्यभूमीचा परिसर फुलून गेला होता. येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी पालिका प्रशासनाने विशेष व्यवस्था केली होती. तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेही अभिवादनासाठी येतील, अशी शक्यता गृहीत धरून पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त केला होता. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. या वेळी सामुदायिक त्रिशरण बुद्धवंदना करण्यात आली. त्यानंतर राज्यपालांनी पालिकेने लावलेल्या बाबासाहेबांच्या सचित्र प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नागपूरमध्ये मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:13 AM