नागपूर : मेडिट्रिना रुग्णालयाचे संचालन करणाऱ्या व्हीआरजी हेल्थ केअर कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर नारायण पालतेवार (वरिष्ठ न्यूरोसर्जन) यांनी आर्थिक हेराफेरी प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ येत्या शुक्रवारी निर्णय देणार आहे.
या अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. कंपनीचे भागधारक गणेश चक्करवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२१ रोजी डॉ. पालतेवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०९ ४०६, ४६५, ४६७, २६८, ४७१ व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पालतेवार यांनी संगणकीय यंत्रणेमध्ये मूळ बिलापेक्षा कमी रकमेची बिले दाखवून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा चक्करवार यांचा आरोप आहे. सत्र न्यायालयाने गेल्या १५ मार्च रोजी पालतेवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खारीज केला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पालतेवार यांच्यातर्फे वरिष्ठ वकील ॲड. अविनाश गुप्ता व ॲड. आकाश गुप्ता तर, चक्करवार यांच्यातर्फे ॲड. श्याम देवानी यांनी कामकाज पाहिले.