नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील स्व. डॉ. कमलाकर तोतडे सभागृह रामटेकच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर भवनाचे तसेच स्व. डॉ. कमलाकर तोतडे सांस्कृतिक सभागृहाचे गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी विद्यापीठाचे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी, माजी कुलगुरू प्रा.उमा वैद्य, कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पांडेय, माजी कुलगुरू प्रा. मधुसुदन पेन्ना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, पुष्पा तोतडे, अरविंद तोतडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिवंगत डॉ. कमलाकर तोतडे यांच्या स्मृतींवर आधारित ‘कमलांजली’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.गडकरी म्हणाले, डॉ. कमलाकर तोतडे यांचे रामटेकशी ऋणानुबंध होते. त्यांचे वडीलही दानशूर होते. त्यामुळे पंचक्रोशीत तोतडे कुटुंबाचा लौकिक होता. डॉक्टरांनी सरकारी सेवा सोडून जनतेची सेवा केली. सेवा आणि उपचाराला प्राधान्य दिले. प्रसंगी अनेक रुग्णांकडून पैसेही घेतले नाहीत. त्यांना लोकांनीच ‘देवदूत’ उपाधी दिली होती. त्यांच्या नावाने हे सभागृह व्हावे, अशी माझी इच्छा होती. या सभागृहाचा फायदा येथील होतकरू कलावंतांना होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला आ. आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांची श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती. संचालन प्रा. पराग जोशी यांनी केले.
रामटेकचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचावारामटेकचा इतिहास लाईट ॲण्ड साऊंड शोच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रभूश्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. कालिदासांचा सहवास या परिसराला लाभला आहे. भविष्यात हा इतिहास नवीन पिढीपर्यंत आधुनिक माध्यमातून पोहोचेल, असा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.